Join us
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांची मोट 23 मेच्या संध्याकाळपर्यंत तरी टिकेल का?; शिवसेनेचा चंद्राबाबूंना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 14:58 IST

चंद्राबाबू सत्तास्थापनेसाठी मोट बांधत नसून राजकीय स्मशानातली ‘राख’ गोळा करीत आहेत. चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत?

मुंबई -  दिल्लीत येण्याआधी चंद्राबाबूंनी जगन व चंद्रशेखर यांच्याबरोबर स्नेहभोजन केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली असती तर त्यांच्या दिल्लीतील हालचालींना बळ मिळाले असते, पण चंद्राबाबू यांनी दिल्लीत जाऊन शरद पवारांची दोनवेळा भेट घेतली व त्यांना आंब्याची पेटी भेट दिली. चर्चा करायला हरकत नाही, पण ही ‘मोट’ 23 तारखेच्या संध्याकाळपर्यंत कोणत्या खडकावर आपटून फुटेल याची खात्री नाही असा टोला शिवसेनेने सामना संपादकीयमधून लगावला आहे. 

दिल्लीचे राजकारण गुरुवारनंतर अस्थिर राहील, असे काहींना वाटते. त्या अस्थिरतेच्या गंगा-यमुनेत हात धुऊन घ्यावेत असे मनसुबे अनेकांनी रचले आहेत. अनेक कुबड्यांच्या आधारे सरपटणारे पंगू सरकार देशाला परवडणार नाही. महाआघाडीत पंतप्रधानपदाचे किमान पाच उमेदवार आहेत. या पाचांचा पचका होण्याचीच चिन्हे जास्त दिसत आहेत. सरकार कोणाचे? हा प्रश्न निकाली निघाला आहे असं संपादकीयमधून सांगण्यात आलं आहे. 

सामना संपादकीयमधील महत्त्वाचे मुद्दे अमित शहा यांचा आत्मविश्वास सांगतोय की, भाजप स्वबळावर 300 जागा जिंकेल व तो टप्पा त्यांनी निवडणुकीच्या पाचव्या चरणातच पार केला. आता योगी आदित्यनाथ यांनी ‘अब की बार 400 पार’ची खात्री दिली. त्यामुळे चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत? 

संपूर्ण देश दुष्काळाशी झुंजतो आहे व मान्सूनची प्रतीक्षा करतो आहे हे खरे, पण 23 तारखेला दिल्लीचे वारे बदलणार काय यावर पैजा लागल्या आहेत.

‘विरोधकांचा फाजील सेक्युलरवाद विरुद्ध मोदी यांचा हिंदुत्ववाद’ असा हा सामना आहे. शेवटी भाजपास व मित्रपक्षांना विजयप्राप्तीसाठी हिंदुत्वाचाच आधार घ्यावा लागला हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा विजय आहे. 

आपण ध्यान केले, पण देवाकडे काहीच मागितले नसल्याचा खुलासा नरेंद्र मोदींनी केला. मागितले नाही तरीही देव त्यांच्या हाती पुन्हा दिल्लीच्या किल्ल्या ठेवणार असल्याचे एकंदरीत वातावरण दिसते

चंद्राबाबू सत्तास्थापनेसाठी मोट बांधत नसून राजकीय स्मशानातली ‘राख’ गोळा करीत आहेत. चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत? चंद्राबाबूंचा सध्याचा उत्साह गुरुवार संध्याकाळपर्यंत टिकून राहो! अशा शुभेच्छा आम्ही त्यांना देत आहोत. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९शिवसेनाचंद्राबाबू नायडूनरेंद्र मोदी