Join us

भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 08:20 IST

म्हाडा आणि एल अँड टी कंपनीतर्फे बुधवारी नायगाव येथील भवानीमाता मंदिर परिसरात रहिवाशांसोबत बैठक आयोजित केली होती.

मुंबई : वरळीनंतर आता नायगावच्या बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाने वेग घेतला असून, म्हाडा अधिकाऱ्यांनी नायगावच्या १० चाळींतील रहिवाशांना पुढील एक ते दीड महिन्यात घरे रिकामी करण्याची सूचना केली. मात्र, भाडेकरार आणि वाढीव भाडे दिल्याशिवाय घरे रिकामी करणार नाही, असा इशारा येथील रहिवाशांनी दिला. 

म्हाडा आणि एल अँड टी कंपनीतर्फे बुधवारी नायगाव येथील भवानीमाता मंदिर परिसरात रहिवाशांसोबत बैठक आयोजित केली होती.  या बैठकीत रहिवाशांनी भाडेकरारासोबत २५ हजार रुपये भाड्यात वाढ करून ३५ हजार ते ४० हजार देण्याची किंवा संक्रमण शिबिरात घरे उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली. 

नायगावच्या पहिल्या टप्प्यातील काही रहिवाशांसोबत भाडेकरार करण्यात वर्षभर टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप स्थानिक रहिवासी महेंद्र मुणगेकर यांनी केला. आधी भाडेकरार करा, मगच घरे रिकामी होतील, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. याशिवाय वरळी बीडीडी प्रकल्पाप्रमाणे नायगावमध्येही दोन नव्हे तर प्रत्येक घरासाठी एक पार्किंग जागा द्यावी, अशी मागणी रहिवासी सचिन पाटणकर यांनी केली.

...अन्यथा प्रकल्प सुरू होण्यास विलंब 

‘म्हाडा’चे या प्रकल्पासाठी नियुक्त झालेले कार्यकारी अभियंता सुनील भडांगे यांनी रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पासाठी दरमहा २५ हजार रुपये भाडे निश्चित झाले असून, वर्षभराचे एकत्र दिले जाईल. 

भाडेकरार घरे रिकामी केल्यानंतर पुढील दोन ते अडीच महिन्यात करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, यावर रहिवाशांचे समाधान झाले नाही. पार्किंगची जागा वरळीला प्रत्येक घरामागे एक दिली असली तरी नायगावला दोन घरांसाठी एक अशीच नियमाप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे. 

म्हाडाकडे केवळ ३०० ते ३५० घरे ट्रान्सीटमध्ये उपलब्ध असल्याने १० चाळीतील ८०० घरातील कुटुंबांना उपलब्ध करून देता येऊ शकत नाहीत. त्यामुळे अन्य रहिवाशांनी भाडे स्वीकारून घरे रिकामी करून द्यावी, अन्यथा प्रकल्प सुरू होण्यास आणि पर्यायाने पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो, असे स्पष्ट केले.

टॅग्स :म्हाडा लॉटरीबांधकाम उद्योगमुंबईसुंदर गृहनियोजन