‘मदर डेअरी’ची जागा देणार नाही, खा. वर्षा गायकवाड यांचे जोरदार ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:18 IST2025-01-24T12:17:32+5:302025-01-24T12:18:16+5:30
Mumbai News: कुर्ला येथील शासकीय मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पातील अपात्र झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी देण्यात येऊ नये. कुर्ल्यातील नागरिकांचा श्वास कोंडला जाऊ नये या मागण्यांसाठी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी जोरदार ठिय्या आंदोलन केले.

‘मदर डेअरी’ची जागा देणार नाही, खा. वर्षा गायकवाड यांचे जोरदार ठिय्या आंदोलन
मुंबई - कुर्ला येथील शासकीय मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पातील अपात्र झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी देण्यात येऊ नये. कुर्ल्यातील नागरिकांचा श्वास कोंडला जाऊ नये या मागण्यांसाठी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी जोरदार ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ला मदर डेअरीची जागा ही बॉटनिकल गार्डनसाठी राखीव असून, ती धारावी प्रकल्पातील पुनर्वसनासाठी अदानीला देण्यात येणार नाही, असे आश्वासन निवडणुकीदरम्यान दिले होते. माजी मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनाचे काय झाले. यामुळे स्थानिकांना प्रदूषणाच्या आणि अन्य समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे, या विरोधात कुर्ला येथील नागरिक जोरदारपणे रस्त्यावर उतरले. हे आंदोलन सर्वसामान्य नागरिकांचे असून, सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
... तेथे पुनर्वसन नको
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलन करताना रस्त्यावर ठिय्या मांडल्याने एससीएलआर पुलाकडून येणारी वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती.
शासकीय डेअरीच्या २१.५ एकर जागेवर धारावी प्रकल्पातील अपात्र झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन होऊ नये आणि या ठिकाणी प्रस्तावित बॉटनिकल गार्डनच व्हावे, अशी मागणी स्थानिकांनी केली.
आम्ही कोणत्याही परिस्थितीत धारावीवासीयांची फसवणूक होऊ देणार नाही. तसेच शासकीय जागासुद्धा बळकावू देणार नाही, जोपर्यंत शासकीय जागा देण्याचा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत लढा देतच राहणार.
- खा. वर्षा गायकवाड, प्रदेशाध्यक्ष, मुंबई काँग्रेस