चित्रपट, नाटक पाहणे महागणार? करमणूक करवाढीचा महापालिकेचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:23 IST2025-01-20T12:22:44+5:302025-01-20T12:23:02+5:30

Mumbai News: महापालिकेने करमणूक कराच्या दरांत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो मंजुरीसाठी राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडे पाठविला आहे.

Will it become more expensive to watch movies and plays? Municipal Corporation proposes to increase entertainment tax | चित्रपट, नाटक पाहणे महागणार? करमणूक करवाढीचा महापालिकेचा प्रस्ताव

चित्रपट, नाटक पाहणे महागणार? करमणूक करवाढीचा महापालिकेचा प्रस्ताव

 मुंबई - महापालिकेने करमणूक कराच्या दरांत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो मंजुरीसाठी राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडे पाठविला आहे. या प्रस्तावानुसार मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये प्रत्येक खेळामागे कमाल ४०० रुपये, वातानुकूलित चित्रपटगृहात प्रत्येक खेळामागे २०० रुपयांची वाढ होणार आहे. तर, विनावातानुकूलित चित्रपटगृहांसाठी प्रत्येक खेळामागे ९०, तर नाटकांच्या प्रत्येक प्रयोगावरील कर १०० रुपयांनी वाढणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास चित्रपट आणि नाटकांच्या तिकीट दरांत वाढ होऊन रसिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

पालिकेकडून चित्रपटगृह, नाटक, सर्कस, आनंदमेळा आदींचे प्रयोग व खेळांवर करमणूक कर आकारला जातो. पालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी या कराच्या दरांत वाढ करण्याची मंजुरी घेतली असून, तो अंतिम मंजुरीसाठी सरकार दरबारी पाठवला आहे. गेल्या १० ते १२ वर्षांपासून पालिका हद्दीत सिंगल स्क्रीनच्या तुलनेत मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे वाढली आहेत. 

मराठी, गुजराती चित्रपटांना करमाफी
मराठी, गुजराती चित्रपट आणि नाटके, एकपात्री नाट्यप्रयोग आणि तमाशा यांना करमणूक कर माफ करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत आगाऊ करमणूक कर भरणाऱ्यांना १९५९ पासून ६ टक्के सवलत दिली जात आहे. २०२५- २०२६ मध्येदेखील करमाफी व सवलत पुढे सुरू राहणार आहे.

चित्रपटाचे तिकीट महागले
दरम्यानच्या काळात महागाई आणि चित्रपटाच्या तिकीट दरांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता पालिकेकडून करमणूक कर म्हणून नाममात्र शुल्क आकारले जाते. आता या करात वाढ करण्याचा विचार आहे. अर्थात, महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत पूर्ण महिन्याचा करभरणा केल्यास सवलत मिळणार आहे.

करमणुकीचा प्रकार    प्रस्तावित दर (प्रत्येक खेळामागे) 
मल्टिप्लेक्स चित्रपटगृह    ४०० रुपये
वातानुकूलित    २०० रुपये
विनावातानुकूलि     ९० रुपये
नाटक, तमाशा    १०० रुपये
सर्कस, आनंदमेळा    १०० (प्रतिदिन)
इतर करमणूक    ७५ रुपये

Web Title: Will it become more expensive to watch movies and plays? Municipal Corporation proposes to increase entertainment tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.