मुंबईमधील घरांच्या किमती कमी होणार? सिमेंटवरील जीएसटी घटला; खरेदीदारांमध्ये उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 10:33 IST2025-10-15T10:32:56+5:302025-10-15T10:33:10+5:30
रिअल इस्टेट विश्लेषकांच्या मते, जीएसटी कपातीचा संभाव्य परिणाम मुख्यतः नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगरांतील मिड-सेगमेंट घरांवर दिसेल.

मुंबईमधील घरांच्या किमती कमी होणार? सिमेंटवरील जीएसटी घटला; खरेदीदारांमध्ये उत्सुकता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र सरकारने सिमेंट, विटा, ग्रेनाइट आणि मार्बलसारख्या बांधकाम साहित्यावरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणला. त्यामुळे मुंबईत घरांच्या किमती कमी होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेट क्षेत्रात ग्राहकांची हालचाल वाढली असताना या निर्णयामुळे खरेदीदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या करकपातीचा फायदा मिळायला अद्याप अवकाश असल्याचे विकासकांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात घरांच्या किमती कमी होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पूर्व, पश्चिम आणि उपनगरांकडे कल
रिअल इस्टेट विश्लेषकांच्या मते, जीएसटी कपातीचा संभाव्य परिणाम मुख्यतः नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगरांतील मिड-सेगमेंट घरांवर दिसेल. दक्षिण मुंबईतील प्रीमियम घरांच्या किमती मात्र फारशा बदलणार नाहीत. अंधेरी, कांदिवली, मुलुंड, भांडूप आणि कल्याण-डोंबिवली परिसरात घर खरेदीसाठी चौकशी वाढल्याचे बिल्डर्सनी सांगितले.
जीएसटी कपातीमुळे प्रकल्पांच्या एकूण खर्चात ५ ते १० टक्के घट होऊ शकते. मात्र, हा परिणाम लगेच दिसून येईलच असे नाही, कारण अनेक प्रकल्पांसाठी सिमेंट आणि अन्य साहित्याचा दीर्घकालीन करार आधीच झालेला असतो.
किमतींवर प्रश्नचिन्ह
जीएसटी कमी झाला आहे. मात्र, बिल्डरांना इनपुट क्रेडिट अजून मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना पैसे तेवढेच भरावे लागतील.
स्वतःचा बंगला किंवा घर बांधणाऱ्यांना मात्र जीएसटी कमी झाल्याचा फायदा मिळू शकतो, असे रिअल इस्टेट विश्लेषकांनी म्हटले आहे.