अजून घोटाळे बाहेर काढू, आणखी कणखरपणे लढू; नवाब मलिकांच्या लेकीचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 22:28 IST2022-02-23T22:26:29+5:302022-02-23T22:28:55+5:30
आमच्यावर जितके आरोप होतील, तितक्याच कणखरपणे लढू; नवाब मलिक यांची मुलगी सनाचा आक्रमक पवित्रा

अजून घोटाळे बाहेर काढू, आणखी कणखरपणे लढू; नवाब मलिकांच्या लेकीचा निर्धार
मुंबई: आमच्यावर जितके आरोप होतील, तितकी अधिक ताकद आम्हाला मिळेल. यापुढे आणखी घोटाळे बाहेर काढले जातील, असा आक्रमक पवित्रा मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना मलिकनं घेतला आहे. वडिलांची भेट होत नसल्यानं सकाळपासून अस्वस्थ होतो. चिंता वाटत होती. मात्र त्यांची भेट झाल्यावर धीर मिळाला. ही लढाई आम्ही लढू आणि जिंकू, अशी आशा तिनं व्यक्त केली.
नवाब मलिक सातत्यानं एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत होते. त्यामुळे त्यांची बोलती बंद करण्यासाठी ईडीनं कारवाई केली यात शंका नाही. हा दिवस कधीतरी येणार याची आम्हाला कल्पना होती. काही दिवसांपासून आमच्या निकटवर्तीयांना समन्स बजावली गेली. नवाब मलिक यांना अडकवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला गेला. त्यामुळे हा दिवस पाहावा लागणार हे आम्हाला माहीत होतं. आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार होतो, असं सना म्हणाल्या.
माझे वडील ३० वर्षांपासून राजकारणात आहेत. आता त्यांच्यावर थेट टेरर फंडिंगचा आरोप झाला आहे. प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. आम्ही कायदेशीर लढा देऊ आणि विजयी होऊ, असा विश्वास सना यांनी व्यक्त केला. सरकारनं मलिक यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे आम्हाला निश्चितपणे ताकद मिळेल. आम्हाला जितका दाबण्याचा प्रयत्न कराल, तितके आम्ही उसळून येऊ आणि कणखरपणे लढू, असा निर्धार सना यांनी बोलून दाखवला.