Join us

मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 16:51 IST

हजारो कोटींचं बजेट असलेली मुंबई महापालिका आपल्या ताब्यात असावी यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे.

मुंबई - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईवर कब्जा करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेत १५० पारचा नारा भाजपाने दिला आहे. मुंबईत महायुतीचा महापौर बसेल असा दावा भाजपासह घटक पक्ष करत आहेत. त्यामुळे महायुतीत शिंदेसेनेच्या वाट्याला फक्त ६५ ते ७० जागा येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हजारो कोटींचं बजेट असलेली मुंबई महापालिका आपल्या ताब्यात असावी यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. त्यात मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. ठाकरे बंधूंची युती झाल्यास मोठ्या प्रमाणात मराठी मते एकवटण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपाने मुंबईत आतापासून तयारी सुरू केली आहे. मुंबईत १५० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे टार्गेट भाजपाने ठेवले आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यानंतर आता मुंबईत सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजपा सज्ज आहे. त्यासाठी १५० जागांवर उमेदवार उतरवण्याची योजना भाजपाने आखली आहे. त्यामुळे जर महायुती झाली तर शिंदेसेनेला ६५ ते ७० जागा सोडण्याची भाजपा तयार असल्याचं बोलले जाते. 

ठाकरे बंधू युतीमुळे गणित बदलणार?

मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली आहे. राज आणि उद्धव यांच्या भेटीगाठी वाढल्याने शिवसेना-मनसे येत्या निवडणुकीत युतीने लढतील अशी चर्चा सुरू आहे. मुंबईत ठाकरे बंधू यांची ताकद आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने मुंबईत भाजपाला धक्का दिला होता. उत्तर मुंबई वगळता इतर ठिकाणी भाजपा उमेदवार पराभूत झाले. शिंदेसेनेचे एकमेव खासदार अत्यंत कमी मताधिक्यांनी निवडून आले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे १० आमदार निवडून आलेत. त्यात आतापर्यंतच्या निवडणुका स्वबळावर लढलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेचेही लाखो मतदार मुंबईत आहेत. जर ठाकरे बंधू एकत्रित आले तर या मतांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेत मतांचे गणित बदलणार आहे.

दरम्यान, अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यात त्यांनी मुंबई महापालिकेत महायुती म्हणूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र इतर महापालिकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन स्वबळाचा नारा दिला जाऊ शकतो असंही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा गड असलेल्या ठाण्यात भाजपा शिंदेसेनेलाच आव्हान उभं करू शकते. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल आहे असं चित्र नाही.  

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: BJP eyes 150+ seats; Shinde's Sena to contest fewer?

Web Summary : BJP aims for 150+ Mumbai civic seats, potentially limiting Shinde Sena to 65-70. A Thackeray reunion could shift power dynamics, worrying BJP. Despite alliance talks, solo efforts are possible elsewhere.
टॅग्स :भाजपाशिवसेनाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस