मुंबई - भाजपात होणाऱ्या पक्ष प्रवेशामुळे माध्यमात शिवसेना-भाजप वेगळं लढणार अशा बातम्या येत आहेत, आम्ही मित्रपक्ष मिळूनच निवडणूक लढू, महाराष्ट्रात युतीचेच सरकार येणार, बहुमताचा नवा विक्रम रचू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत युती तुटणार असल्याच्या बातमीवर स्पष्टीकरण दिलं.
आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवू, पुन्हा युतीचंच सरकार येणार, आता फक्त बहुमताचा विक्रम मोडीत काढायचा आहे धाक किंवा प्रलोभनं दाखवून भाजपमध्ये प्रवेश दिले नाहीत असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला. आम्ही आधी राधाकृष्ण विखेंना भाजपमध्ये घेतलं नाही, आधी सुजय विखेंना घेतलं, तसंच आधी वैभव पिचडांना घेतल्याने मधुकर पिचड सापडले, त्याशिवाय आधी रणजीतसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेतल्याने विजयसिंह मोहिते पाटील आपोआप आले. त्यामुळे संदीप नाईक आलेत. गणेश नाईकांचे आशीर्वाद त्यांच्यामागे कायम राहतील असं सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चिमटा काढला.
यावेळी शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती, समरजीत घाटगे भाजपमध्ये यापूर्वीच आलेत, आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये दाखल झाले आहेत असं सांगत शिवेंद्रराजे भोसले यांचे स्वागत केले. तसेच मधुकर पिचड, कालिदास कोळंबकर यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्यांच्या भाजप प्रवेशाने अनुभवी नेत्यांची फळी दाखल झाली त्याचा फायदा पक्षाला होईल असा विश्वास व्यक्त केला.
गेल्या वेळी मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. बहुमतासाठी केवळ तेवीस जागा कमी पडल्या. काही अपक्ष आणि सहकारी पक्षांसह ही संख्या १३२वर गेली होती, तरीदेखील बहुमतासाठी १३ जागा कमी पडल्याने अखेर शिवसेनेशी आपल्या शर्थीवर युती करून पाच वर्षे सरकारने कार्यकाल पूर्ण केला. लोकसभेतील यश, मोदींची प्रतिमा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्ण केलेल्या कार्यकालावर भाजपचाच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असे जाहीर करून शिवसेनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याची तयारी केली आहे. भाजपचे संघटन कमकुवत असलेल्या मतदारसंघात कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा सक्षम कार्यकर्ता, आमदार यांना पक्षात घेण्याची मोहीमच उघडली आहे असं बोललं जातं.