Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलुंडमध्ये पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून हत्या; आरोपीला २० तासांत अटक; कौटुंबिक वाद कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 08:24 IST

या घटनेत पुष्पा गुप्ता (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही घटना त्यांच्या १३ वर्षीय मुलासमोर घडली. कुर्ला रेल्वे पोलिसांनी तत्पर कारवाई करत २० तासांत आरोपी पती राजू गुप्ताला अटक केली.

मुंबई : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून तिची हत्या केल्याची घटना मुलुंड रेल्वेस्थानकात घडली. या घटनेत पुष्पा गुप्ता (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही घटना त्यांच्या १३ वर्षीय मुलासमोर घडली. कुर्ला रेल्वेपोलिसांनी तत्पर कारवाई करत २० तासांत आरोपी पती राजू गुप्ताला अटक केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, राजू गुप्ता हा पत्नी पुष्पा आणि दोन मुलांसह मुलुंड पश्चिमेतील रामगड परिसरात राहत होता. पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याने पुष्पाने यापूर्वी स्थानिक पोलिसांत तक्रारही केली होती. या सततच्या वादामुळे ती काही दिवस माहेरी उत्तर प्रदेश येथे गेली होती. दरम्यान, वाद मिटवण्यासाठी तिचा भाऊ कमलेश कुमार (सैन्यातील जवान) मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला.

१४ मार्च रोजी कमलेश बहिणीला आणि तिच्या मुलाला घेऊन मुलुंड येथे आला. मात्र, पुन्हा एकदा पती-पत्नीमध्ये वाद झाला. परिस्थिती न सुटल्याने पुष्पाने मुलुंड पोलिस ठाण्यात दुसरी तक्रार नोंदवली. त्यानंतर ते कळवा येथे नातेवाइकांकडे जाण्यासाठी निघाले होते. 

कमलेशचे ओळखपत्र आणि एटीएम कार्ड घरी राहिल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पुष्पाला मुलुंड स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर थांबवले आणि मोठ्या मुलासह घरी परतला. घरी गेल्यावर त्याचा आणि राजूचा वाद झाला. संतापलेल्या राजूने कमलेशला घरात कोंडून ठेवले आणि धाकट्या मुलाला घेऊन तो थेट स्थानकावर पोहोचला. स्थानकावर राजू याने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र पुष्पाने घटस्फोटाची मागणी कायम ठेवली. या वादातून संतापलेल्या राजूने तिला धावत्या लोकलसमोर ढकलले. घटनेनंतर आरोपी राजू दादरमार्गे विरारला आणि तेथून सूरतला पळून गेला. कुर्ला रेल्वे पोलिसांनी सूरतमधील स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने त्याचा कसून शोध घेण्यात आला. अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Husband Kills Wife at Mulund Station; Arrested Within 20 Hours

Web Summary : In Mulund, a husband pushed his wife in front of a train after a domestic dispute. The woman died instantly in front of their child. Police arrested the husband in Surat within 20 hours. Family conflict was the motive.
टॅग्स :पती- जोडीदारलोकलरेल्वेपोलिस