डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ज्ञ
आपण रात्रीच का झोपतो? तर शरीरामध्ये असलेले जैविक घड्याळ किंवा सिर्क्याडीअन क्लॉक जे सूर्यप्रकाशाप्रमाणे बदलत राहते, यांच्याशी झोपेचा संबंध आहे. जसा जसा सूर्यप्रकाश कमी होऊ लागतो, तसंतसं शरीरात मेलोटोनीन हे संप्रेरक स्त्रवू लागतं आणि झोप येऊ लागते. मेंदूतील व्हेव ॲक्टिव्हिटी, संप्रेरकांची निर्मिती, पेशींची निर्मिती आणि इतर महत्त्वाची कार्ये या घड्याळाशी, पर्यायाने झोपेशी संबंधित आहेत. त्यामुळे योग्य वेळी, योग्य प्रमाणात झोप येणे हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.
चांगल्या, शांत, पुरेशा झोपेमुळे...
हृदय निरोगी राहण्यास मदत होते. अपुऱ्या झोपेचा संबंध अनियमित रक्तदाब, क्लोरेस्ट्राॅलशी आहे.
ताणतणाव कमी होतो. स्ट्रेस संप्रेरके कमी स्त्रवतात. पर्यायाने रक्तदाब नियमन व हृदयासाठी उपयुक्त.
शरीर झोपलेले असले, तरीही मेंदू, दिवसभरातील व पूर्वीच्या घटना, भावना, स्मृती, अनुभव वगैरेंची सांगड घालून मेमरी कॉन्सोलिडेशनचे (स्मृतींच्या फाइल्स तयार करण्याचे) महत्त्वाचे काम करत असतो. चांगली झोप आपल्याला उत्साही, तसेच सतर्क बनवते. तसेच, दुसऱ्या दिवशी चांगली झोप मिळण्याची एक चांगली शक्यता निर्माण होते.
झोपेमध्ये पेशी जास्त प्रथिने निर्माण करतात, ज्याचा उपयोग नादुरुस्त पेशींची, स्नायूंची दुरुस्ती व जोपासना यासाठी होतो. शारीरिक आजार बरे होण्यास व एकूणच प्रतिबंध होण्यास मदत होते.
झोपेसाठी काही टिप्स
१. शक्यतो रात्री झोपण्याची व सकाळी उठण्याची विशिष्ट वेळ ठरवून पाळावी. २. संध्याकाळनंतर चहा, कॉफी इ. पेये घेऊ नयेत. ३. रोज भरपूर व्यायाम करावा, परंतु व्यायाम व रात्रीची झोप यांतील अंतर ३ ते ४ तासांचे असावे. ४. रात्री उशिरा व जड जेवण जेवू नये. रात्रीचे जेवण व झोपेची वेळ यात किमान दीड-दोन तासांचे अंतर हवे.५. झोपण्यापूर्वी ध्यान-धारणा, संगीत ऐकणे, शक्य असल्यास स्नान करणे उपयुक्त ठरते. ६. मनात काळजीचे विचार येत असतील, तर त्यांची एक यादी बनवावी. स्वत:ला सांगावे की, याबद्दल मी उद्या ‘वरी टाइम’ (काळजीचे विचार करण्याची विशिष्ट वेळ)मध्ये विचार करीन. सोयीने तसा दिवसातला ‘वरी टाइम’ ठरवून घ्यावा. त्यावेळी काळजीच्या प्रश्नांवर विवेकपूर्वक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा.