Join us

पक्षासाठी ७ वर्ष अनवाणी राहणाऱ्या महिला नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ का सोडली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:24 IST

आमच्यासोबत कुरघोडीचं राजकारण करत असेल तर ५ वर्ष तिथे राहण्यापेक्षा विरोधातच दुश्मनी घेऊ असंही आव्हानही राजूल पटेल यांनी ठाकरे गटाला दिले. 

मुंबई - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. उद्धव ठाकरे गटाला सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे. त्यात मुंबईत कधीकाळी पक्षासाठी ७ वर्ष अनवाणी राहणाऱ्या महिला नेत्यानेही ठाकरेंची साथ सोडली. राजूल पटेल या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या होत्या परंतु त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश का केला असा प्रश्न सगळ्यांना पडला. त्यावर पटेल यांनीच खुलासा केला आहे.

राजूल पटेल म्हणाल्या की, मी प्रवेश करायला खूप उशीर केला असं वाटते. मला एकनाथ शिंदे आणि तिथल्या नेत्यांनी बऱ्याचदा पक्षात येण्यास सांगितले परंतु मी एकनिष्ठ म्हणून इथं राहिले. पक्षात राहत असताना विभागात जे कुरघोडीचं राजकारण सुरू झाले त्यामुळे मी पक्षप्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या कामाची जी पद्धत आहे. त्यातून प्रेरित होऊन मी प्रवेश केला. राजू पेडणेकर आणि माझा वाद तत्वाशी होता. आमच्या घरातील भांडणे नव्हती. संघटनेसाठी भांडणे होती. ही भांडणे सोडवण्यासाठी नेतृत्वाने दोघांना बसून वाद मिटवायला हवा होता. परंतु ते काही केले नाही असा आरोप त्यांनी केला.

तसेच आगीत तेल ओतायचं काम काहींनी केले. हारून खान यांना उमेदवारी देत नेतृत्वाने एका दगडात दोन पक्षी मारले. आमचे डोळे उघडले. पक्षात थांबून चूक केली याची जाणीव झाली. माझ्यासारखी कट्टर शिवसैनिक, निस्वार्थ भावाने काम केले त्याच्यावर आरोप करतायेत मी खंडन करते. पळतंय कोण आणि राहतंय कोण हे मी दाखवणार आहोत. लोकांना दाखवण्यासाठी आता काहीजण नाटके करतायेत. १९९७ साली पहिल्यांदा नगरसेवक झाली तेव्हा मी स्वत: ४ लाख रुपये देऊन जमीन खरेदी केली. मी कार्यकर्त्याच्या नावाने पेपर बनवले. १९९९ पासून लाईटबिल माझ्या नावाने आहे. शिवसेनेसाठी जितकी आंदोलन केली त्याचे पुरावे माझ्याकडे आहे. मी शाखा उभारली इतरांसाठी कार्यालये उभारली नाहीत असा टोला राजूल पटेल यांनी अनिल परब यांना लगावला. 

दरम्यान, २००० साली शिवसेना शाखा तुटली होती. २००२ पर्यंत मी उघड्या शाखेत बसत होती. तेव्हा नेत्यांना ती शाखा उभारावी असं का वाटले नाही. तुम्ही तेव्हाही आमदार होता. शाखा बनवून देऊ असं तुम्हाला वाटलं नाही. २००२ साली मी निवडून आली तेव्हा पुन्हा उभे राहून शाखा बनवून घेतली. नेतृत्वाने शिवसैनिकांना विचारलं कुठे, स्वार्थासाठी जायचं असतं तर इलेक्शन आधीच गेली असती. भाजपाने आमदारकीची ऑफर दिली तरीही गेली नाही. निवडून आलेली व्यक्ती दुजाभाव करत असेल, आमच्यासोबत कुरघोडीचं राजकारण करत असेल तर ५ वर्ष तिथे राहण्यापेक्षा विरोधातच दुश्मनी घेऊ असंही आव्हानही राजूल पटेल यांनी ठाकरे गटाला दिले. 

पक्षासाठी ७ वर्ष अनवाणी राहिल्या...

शिवसेनेचा मुख्यमंत्री जोपर्यंत या महाराष्ट्रात होत नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा राजूल पटेल यांनी घेतली होती. तब्बल ७ वर्षांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले तेव्हा पटेल यांनी पायात चप्पल घातली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे २०१२ साली निधन झाले होते तेव्हा राजूल पटेल यांनी पक्षासाठी ही शपथ घेत पायात चप्पल न घालता ७ वर्ष अनवाणी प्रवास केला होता. 

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे