Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 09:44 IST

मराठी कलाकारांनी हिंदी सक्तीची करण्याच्या वादापासून स्वतःला दूर ठेवलं आहे आणि त्यावरूनच मनसेचे संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे. 

महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणापासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध होत आहे. मनसेने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मराठी कलाकारांकडून बाळगल्या जाणाऱ्या मौनावर संताप व्यक्त केला आहे. 'चित्रपटगृह मिळालं नाही की राजसाहेबांकडे येणारे मराठी कलाकार हिंदी सक्ती विरोधात का गप्प आहेत?', असा थेट सवाल त्यांनी मराठी कलाकारांना केला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण लागू केले आहे. या धोरणातील त्रिभाषा सुत्रांनुसार महाराष्ट्रात मुलांना पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. 

हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध

राज्य सरकारकडून यासंदर्भात आदेश जारी करण्यात आल्यानंतर याला विरोध होऊ लागला आहे. अनेक संघटना आणि राजकीय पक्ष याला विरोध करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील काही लोकांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. मात्र, काही अपवाद वगळता मराठी कलाकारांकडून याबद्दल मौन बाळगले जात आहे. 

संदीप देशपांडे मराठी कलाकारांना काय म्हणाले?

अनेक वेळा हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांना चित्रपटगृहात स्क्रीन मिळत नाही. अशा वेळी मराठी कलाकार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटतात आणि मराठी चित्रपटांवर कसा अन्याय होतोय, याबद्दल बोलतात. याच मुद्द्यावर बोट ठेवत मनसेचे नेते संदीप देशपांडे हे मराठी कलाकारांवर संतापले. 

हेही वाचा >>राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध

"चित्रपटगृह मिळालं नाही की राजसाहेबांकडे येणारे मराठी कलाकार हिंदी सक्ती विरोधात का गप्प आहेत?", असा संताप देशपांडेंनी व्यक्त केला. 

"आपण कशाला राजकारणात पडा या कुपमंडूक वृत्तीतून बाहेर पडला नाहीत, तर उद्योग ही मरेल आणि भाषा ही मरेल", असा इशारा संदीप देशपांडेंनी मराठी कलाकारांना दिला आहे. 

केंद्र सरकारकडून हिंदी लादण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप विरोधी राजकीय पक्षांकडून होत आहे. हिंदू आहोत, पण हिंदी नाही, अशा आशयाचे बॅनर्सही मुंबईत झळकले आहेत. राज्यातही काही संघटनाकडून याला विरोध होत आहे. 

टॅग्स :संदीप देशपांडेमनसेमराठी अभिनेतामराठीहिंदी