आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 07:36 IST2025-11-02T07:35:26+5:302025-11-02T07:36:08+5:30
मतचोरीचे पुरावे दिल्यानंतर आता आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे- उद्धव ठाकरे

आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: माझ्यासकट माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावे मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला आहे का, हे शोधले पाहिजे. नक्कीच यात काही तरी डाव आहे. आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात आहे? कुणाची नावे काढायची, कुणाची टाकायची, कुणी किती वेळ मतदान करायचे याचा कट सुरू आहे, असा हल्लाबोल उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील महामोर्चात केला.
ते म्हणाले की, निवडणूक आयुक्तच लाचार झालेले आहेत, शिवसेनेचा खटला तीन वर्षे न्यायालयात सुरू आहे, पण आता आम्ही मतचोरीचे पुरावे दिल्यानंतर न्याय मिळालाच पाहिजे. ऑनलाइन अर्ज करून, खोटा मोबाइल नंबर देऊन मतदार यादीतून आपले नाव वगळण्यासाठी अर्ज केल्याची धक्कादायक माहितीही त्यांनी यावेळी दिली. निवडणूक आयोगाची माणसे याबाबत खात्री करण्यासाठी आपल्या घरी आली तेव्हा ही बाब समजल्याचे त्यांनी सांगितले. २३ ऑक्टोबर रोजी हा अर्ज केला होता, असा दावा उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, २०१७ पासून मी ओरडून सांगतोय ईव्हीएममध्ये गोंधळ आहे. निवडून आलेले मी कसा आलो हे चिमटे काढून बघत होते. ही सगळी कारस्थाने आयोगामार्फत सुरू आहेत. मग आम्ही कशी निवडणूक लढवायची? तुम्ही घराघरांत जा, याद्यांवरती काम करा, चेहरे कळले पाहिजेत, एका-एका यादीवरील चेहरे तपासा, त्यानंतर जर समजा तिकडे दुबार-तिबार वाले आले तर तिथेच फोडून काढायचे, बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे, त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत.
मोर्चात अवतरले यमराज : एक व्यक्ती यम राजाच्या वेशभूषेत अवतरली होती. यम लोकांतून आलो आहे. १२४, ११७, ९०, ८० वर्ष वय असणारे ते कुठे आहेत? बोगस मतदान करणारे व जे या जगातच नाहीत त्यांना यम लोकी घेऊन जाणार आहे. झुकेगा नही बोलणाऱ्यांना पहिले घेऊन जाणार. दोन-तीन ठिकाणी नाव नोंदवून त्यांनी मलाही सोडले नाही तर मी त्यांना कसे सोडू? मृत असूनही मतदान करणाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी आलो आहे. गरज लागेल तेव्हा पृथ्वीवर येईन, असे ते सांगत होते.
राज यांनी दाखविला ढीग : कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडीमधील ४,५०० मतदारांनी मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघातही मतदान केल्याचा दावा राज ठाकरे यांनी भाषणात केला. तर १ जुलै रोजी अंतिम केलेल्या मतदार यादीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघांत ५० हजार ते १ लाखाच्या घरात मतदारांची दुबार नावे असल्याचा दावा करत या सगळ्याच्या पुराव्यांचा ढीग त्यांनी दाखवला. त्याची यादीही त्यांनी वाचून दाखविली.
डाव्या पक्षांचा लाल सलाम : माकपचे शैलेंद्र कांबळे, अजित नवले व भाकपचे सुभाष लांडे, प्रकाश रेड्डी, मिलिंद रानडे यांनी डाव्या पक्षांचे वैशिष्ट्य जपत ‘लाल सलाम’च्या घोषणा दिल्या. डफाच्या तालावर गाणी म्हणत त्यांनी वातावरणात जोश निर्माण केला. त्यांच्या घोषणाबाजीत राष्ट्रवादीचे कार्यर्कते, शिवसैनिक सामील होत होते.
आम्ही न्यायालयात जाऊच; जनता निर्णय घायला समर्थ
विरोधक आरोप करतात मग न्यायालयात का जात नाहीत, असा सवाल सातत्याने भाजपकडून केला जात आहे. यावर, मतचोरीविरुद्ध आम्ही लवकरच न्यायालयात जावू असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. न्यायालयात न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री आहेच, पण जनतेचे न्यायालय या मतचोरांचे काय करायचे याचा निर्णय घ्यायला सक्षम आहे. मतचोरी करून निवडणुका घेण्याचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्राने आवळलेली मुठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही,असे ते म्हणाले.
राज यांचा लोकल प्रवास अन् तिकिटावर ऑटोग्राफ
मोर्चाला जाण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर ते चर्चगेट प्रवास लोकलने केला. गर्दीमुळे त्यांना १०:१६ व १०:१९ या दोन लोकल सोडाव्या लागल्या. १०:२२ ची लोकल पकडली. विशेष म्हणजे, या लोकलमध्ये त्यांना 'विंडो सीट' मिळाली. प्रवासात त्यांनी काही प्रवाशांच्या विनंतीवरून त्यांच्या तिकीटावर स्वाक्षरी केली.
राज ठाकरे यांनी रेल्वे प्रवास करून मोर्चास्थळी येण्याचे आवाहन केले होते. त्याला उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिसाद दिला. त्यामुळे सीएसएमटी व चर्चगेट ही दोन्ही मुख्य रेल्वे स्थानके मनसैनिक व शिवसैनिकांच्या गर्दीने फुलून गेली होती.