'सरकारमधून बाहेर पडत भाजपसोबत कोण जाणार, याचीच चढाओढ चाललीय'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 16:04 IST2021-12-30T16:00:26+5:302021-12-30T16:04:14+5:30
नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांच्यात झालेली चर्चा आपल्याला कळनेच अवघड आहे, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार-मोदी भेटीवर भाष्य करण्याचे टाळले.

'सरकारमधून बाहेर पडत भाजपसोबत कोण जाणार, याचीच चढाओढ चाललीय'
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशासनावर चांगली पकड आहे आणि ही त्यांची मजबूत बाजू आहे," असं म्हणत शरद पवार यांनी मोदींचं कौतुक केलं. बुधवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. पवार यांच्या या विधानानंतर भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, पाटील यांनी भाष्य करण्याइतका मोठा नेता आपण नसल्याचं म्हटलंय.
नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांच्यात झालेली चर्चा आपल्याला कळनेच अवघड आहे, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार-मोदी भेटीवर भाष्य करण्याचे टाळले. मात्र, राज्याच्या राजकारणात आता सरकारमधून बाहेर पडत भाजपसोबत कोण जाणार, याची चढाओढ राजकीय पक्षात चाललीय, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला.
प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा पत्रकारांशी संवाद. https://t.co/CJztT0XnWW
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 30, 2021
राज्यातील भाजप-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालेलं, यास आपण सहमती दिली नसल्याचं पवार यांनी सांगितलं. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवार आणि नरेंद्र मोदी, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि अजित पवार यांच्यात काय चर्चा झाली हे सांगण्याइतका मी मोठा नेता नाही, असे पाटील यांनी म्हटले. राज्यात गेल्या 2 दिवसांपासून जे चाललंय ते याच चढाओढीचा परिणाम आहे. कोण बाहेर पडणार आणि भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन करणार, याची चढाओढ लागल्याचं पाटील यांनी म्हटलं. भाजपमध्ये मी एकटा निर्णय घेत नाही, आमची 9 जणांची कोअर कमिटी आहे, ती कमिटी निर्णय घेते, असेही पाटील यांनी सांगितले.
काय म्हणाले शरद पवार
शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या कार्यशैलीचे कौतुक केलं, तसंच मोदींनी एखादं काम हाती घेतलं तर ते काम पूर्ण करतातचं, असं पवार यावेळी म्हणाले. "मोदी खूप मेहनत घेतात आणि काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळही देतात. एकदा का कोणतंही काम हाती घेतले की ते (काम) पूर्ण होईपर्यंत ते थांबणार नाही याची काळजी घेतात, असा मोदींचा स्वभाव आहे," असंही त्यांनी नमूद केलं.