Join us

शिवसेना की ठाकरे गट? शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा? महिनाभरापूर्वीच अर्ज; पालिकेसमोर पेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 15:59 IST

Dasara Melava On Shivaji Park: यंदा पुन्हा पेच निर्माण होण्याची शक्यता असून, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिवसेना शिंदे गटाचा होतो की ठाकरे गटाचा याकडे लक्ष लागले आहे.

Dasara Melava On Shivaji Park: शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अर्ज करण्यात आला आहे. गेल्या वर्षी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून महिनाभरापूर्वीच अर्ज करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार? शिवसेना शिंदे गटाचा की ठाकरे गटाचा? महापालिका प्रशासन कोणाच्या बाजूने निर्णय देणार, याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षावरच दावा केला होता. केंद्रीय निवडणूक आयोगात हे प्रकरण पोहोचल्यानंतर शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले. याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली. मात्र, त्याआधी दसरा मेळाव्यावरून दोन्ही गट आमने-सामने आले होते. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट आग्रही होता. मात्र, तसे झाले नाही. ठाकरे गटाने दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेतला होता. शिंदे गटाने बीकेसीवर मेळावा घेतला. 

महापालिका प्रशासनासमोर पेच अन् विधी विभागाचा अभिप्राय

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे गटाकडून महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. एक महिन्यांपूर्वीच हा अर्ज करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. एकनाथ शिंदे गटानेही शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला आहे. दोन्ही गटाचे अर्ज आल्याने महानगरपालिका प्रशासन सावध झाले आहे. मागील वर्षीही असाच वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेने विधी विभागाकडून अभिप्राय मागितला आहे, असे समजते. त्यामुळे यावेळी कोणाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळते हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर मेळावा कोण घेणार असा पेच निर्माण झाला. हा वाद न्यायालयात गेला. शिवसेना कोणाची याबाबत निर्णय झालेला नव्हता. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली. यंदा मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे. त्यामुळे नेमका काय निर्णय प्रशासन घेत हे पाहावे लागेल. दोन्ही पक्षांकडून अर्ज प्राप्त झाल्याने आता विधी विभागाच्या निर्णयाकडे लक्ष असणार आहे.  

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेउद्धव ठाकरेदसरामुंबई महानगरपालिका