दीपक केसरकर यांच्या घरासमोर उपोषण करणारा रोहित आर्या कोण होता? काय होत्या मागण्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 07:45 IST2025-10-31T06:37:29+5:302025-10-31T07:45:36+5:30
तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर केली उपोषणे

दीपक केसरकर यांच्या घरासमोर उपोषण करणारा रोहित आर्या कोण होता? काय होत्या मागण्या?
मुंबई : 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या 'पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पा'ची २ कोटींहून अधिक रक्कम परत न केल्याचा आरोप रोहित आर्या याने केला होता. या अभियानात राज्यातील काही राजकीय नेत्यांच्या शाळांना चुकीचे गुण देत, जाणीवपूर्वक त्याच शाळांची विजेते म्हणून निवड केली, असा गौप्यस्फोटही त्याने केला होता. त्याने तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर अनेकदा उपोषणेही केली होती.
'स्वच्छता मॉनिटर' अभियानासाठी लावलेले २ कोटी रुपये परत न मिळाल्याने तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर अनेकदा उपोषणे केली होती. आर्याने वर्ष २०१३ मध्ये गुजरातमध्ये 'लेट्स चेंज' या मोहिमेद्वारे 'पीएलसी स्वच्छता मॉनिटर' प्रकल्पाची सुरुवात केली होती. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करून त्यांना 'स्वच्छता दूत' बनवणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता. नंतर आर्या याने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये हा प्रकल्प राबवायला सुरुवात केली.
राबवायला सुरुवात केली, केसरकर यांच्या सूचनेनुसार आर्याने पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्प स्वखर्चाने राज्यातील शाळांमध्ये २०२२ मध्ये राबविण्यास सुरुवात केली. या प्रकल्पामुळे शाळांचा परिसर स्वच्छ राहण्यास सुरुवात झाली. याची दखल शिक्षण विभागाने घेत सरकारी निर्णय प्रसिद्ध केले. त्यानंतर हा प्रकल्प राबविण्यासाठी शिक्षण विभागाने २०२३ मध्ये काही प्रमाणात आर्थिक साहाय्य केल्याचे आर्याने सांगितले होते. या प्रकल्पाची गुणवत्ता पाहून या प्रकल्पाला २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियान राबविण्याला मान्यता मिळाली. त्यासाठी दहा गुण देण्यात आले. या प्रकल्पासाठी शिक्षण विभागाने स्वतंत्र २ कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र, प्रत्यक्षात हे पैसे आपल्याला मिळाले नसल्याचा आणि शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी जानेवारी २०२४ पासून पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आर्या याने केला होता.
नेमके काय म्हणाला होता आर्या ?
शिक्षण विभागाने 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातून परस्पर वगळले. मात्र, माझा प्रकल्प कायम ठेवला आहे. त्यामुळे गेल्यावर्षी जुलै महिन्यात उपोषणाला सुरुवात केली. मात्र, मंत्री केसरकर यांच्या आश्वासनामुळे उपोषण मागे घेतले. त्यानंतरही कामाचे पैसे न मिळाल्याने पुन्हा ऑगस्ट महिन्यात उपोषण केले. त्यावेळी अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. मात्र, कोणताही निर्णय झाला नाही. अखेर वैतागून केसरकर यांच्या सरकारी बंगल्याबाहेर २९ सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले. तेव्हा केसरकर यांनी मला वैयक्तिक मदत म्हणून ७ लाख आणि ८ लाख असे दोन धनादेश दिले आणि उर्वरित रक्कम ४ ऑक्टोबरला देण्याचे आश्वासन दिले; परंतु आतापर्यंत उर्वरित रक्कम मिळाली नाही.