Who is Narayan Rane? sanjay raut take it easy to narayan rane | कोण... कोण नारायण राणे?, संजय राऊतांनी उडवली राणेंची खिल्ली

कोण... कोण नारायण राणे?, संजय राऊतांनी उडवली राणेंची खिल्ली

मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय यांच्या वक्तव्याचा खासदार नारायण राणेंनी तीव्र शब्दात निषेध केला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. महाराजांच्या वंशजाबद्दल कुणीही असं बोलत असेल, तर त्याची जीभ जागेवर ठेवायची नाही, असे म्हणत राणेंनी संजय राऊतांना लक्ष्य केले. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता कोण.. कोण... कोण नारायण राणे? असे म्हणत नारायण राणेंची खिल्ली उडवली. तसेच, अनेकांना टीका करण्याचं काम मिळालं, असेही राऊत यांनी म्हटले. 

आज के शिवाजी - नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन सुरु झालेल्या वादात नारायण राणेंनी उडी घेतली. शिवसेना आणि काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाल्याचं राणेंनी म्हटलं. संजय राऊत यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीबाबत केलेले विधान अखेर मागे घेतले आहे. मी केलेल्या वक्यव्यामुळे कुणी दुखावले असेल तर हे विधान मी मागे घेत आहे, असे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. याबाबत बोलताना नारायण राणेंनी काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाल्याचं म्हटलंय. 

काँग्रेसला सत्ता पाहिजे आणि सत्तेतून पैसा मिळवायचा आहे. त्यामुळे इंदिरा गांधींबद्दल बोलले किंवा नेहरूंबद्दल बोलले तरी काँग्रेसला काहीच वाटणार नाही, असे म्हणत काँग्रेस सत्तेसाठी काहीही सहन करेल, असे राणेंनी म्हटले. त्याचसोबत, शिवसेनेचा जन्मच शिवाजी महाराजांच्या नावाने झालेला आहे. त्यामुळे शिवसेना हे कसं खपवून घेते, असा प्रश्नही राणेंनी विचारला. तर, संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांच्या भावाला मंत्रिपद मिळाल नाही, म्हणून ते असं काहीही बोलत आहेत, असेही राणेंनी म्हटले होते.
राणेंच्या या ट्विटला उत्तर देताना, संजय राऊत यांनी कोण नारायण राणे? असे म्हणत राणेंची खिल्ली उडवली. तसेच, टीका करणाऱ्यांना काही काम नव्हतं, या निम्मिताने काहीतरी काम मिळालं. तर, कोण काय टीका करतंय यावर प्रतिक्रिया द्यायला मला वेळ नाही, असेही राऊत यांनी म्हटले. आम्हाला जनतेसाठी चांगलं काम करायचं असून आम्ही सरकारच्या मध्यमातून ते काम करण्यात जास्त वेळ घालवू इच्छितो, असेही राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.  

दरम्यान, उदयनराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत, असे संजय राऊत यांनी लोकमत पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीवेळी म्हटले होते. तसेच, एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डचा दबदबा होता. त्यावेळी मोठमोठ्या नियुक्त्यासुद्धा या अंडरवर्ल्डच्या सल्ल्याने होत. त्याकाळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटल्या होत्या, असा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. 

Web Title: Who is Narayan Rane? sanjay raut take it easy to narayan rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.