Who is the man in of Director PMC Bank? - Raj Thackeray | Maharashtra Election 2019 : पीएमसी बँकेवर अधिकारपदाची माणसं कोण ?, राज ठाकरेंचा भाजपावर निशाणा

Maharashtra Election 2019 : पीएमसी बँकेवर अधिकारपदाची माणसं कोण ?, राज ठाकरेंचा भाजपावर निशाणा

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मनसेच्या उमेदवारासाठी सांताक्रूझमध्ये प्रचारसभा घेतली आहे. सांताक्रूझमधील उमेदवार अखिल चित्रे यांच्या प्रचारसभेत राज ठाकरेंनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पीएमसी बँक बुडाली, लोकांचे हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत. बरं ह्या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण तर भाजपाची. शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झालेत आणि सरकार कसंही वागतात, न्यायालयांकडून निर्णय मिळत नाहीत. मग जनतेचा राग कोण व्यक्त करणार?, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. 

पुढे ते म्हणाले, तुमच्यासमोर सगळे वाकून येतात, अरे हे वर्षानुवर्ष सुरू आहे. सर्व शहरांचा विचका झाला आहे. विधानसभेमधले विरोधी पक्षनेते भाजपात गेले. तुमचे प्रश्न मांडणार कोण, तुमचा राग व्यक्त करणार कोण, तुमची खदखद सरकारसमोर ठेवणार कोण?, बँका बुडतायत, लोक सांगतायत आता लग्न कसे करू, बँक बुडाली. पीएमसी बँक पंजाब महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण तर भाजपाची माणसं आहेत. सगळ्याच गोष्टी संगनमतानं चालायला लागल्या तर तुमचा आवाज कोण मांडणार, रोजच्या रोज वाहनं वाढतायत; शहरामध्ये, रस्त्यांवर खड्डे होतायत, जाणिवा मेल्या की काय तुमच्या, समाजातल्या जाणिवा ज्या दिवशी मरतात ना, त्यादिवशी जिवंत प्रेतं उरतात.

तुम्ही आहात काय किंवा नाही आहात काय कोण विचारतंय तुम्हाला, तुम्ही कधी प्रश्न विचारणार आहात. तरुणांच्या नोकऱ्याचं काय झालं, उद्योगधंदे जातायत, असलेल्यांच्या नोकऱ्या जातायत आणि नसलेल्यांना त्या मिळत नाही आहेत. कालची पुण्याची सभा वादळी पाऊसामुळे रद्द करावी लागली. त्यात काल पीएमटी बस चालक बसवर झाड पडून मृत्युमुखी पडला. महाराष्ट्र एक नंबरचं राज्य अधोगतीला जात असेल, तर बाकीच्या राज्यांचं काय घेऊन बसलात. या विधानसभा निवडणुकीला मी एक भूमिका घेतली, ती भूमिका फक्त मी तुमच्यासमोर मांडायला आलो आहे. पुढच्या काही दिवसांत 18 ते 19 सभा आहेत. सगळीकडून फिरून हीच भूमिका तुमच्यामध्ये फिरवायची आहे.

जगाचा याबाबतीतला इतिहास मला माहीत नाही. आज शहरं खड्ड्यात आहेत, लोकं खड्ड्यात पडून मरत आहेत. बेरोजगारी टोकाला आहे, उद्योग बंद पडत आहेत. ठाण्यात एक मुलगी स्वतःच्या लग्नाची खरेदी करायला निघाली आणि खड्ड्यात पडून ती अपघातात मृत्युमुखी पडली. शहरांचा पार विचका झालाय. अर्ध्या तासाच्या पावसाने पुण्याची जरी अशी अवस्था होत असेल तर काय बोलायचं?, शहरांचं नियोजन कोसळलंय, निवडणुका आल्या की जाहीरनामे बाहेर येतात, वाट्टेल ती आश्वासन दिली जातात, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Who is the man in of Director PMC Bank? - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.