मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात राजकीय भूकंप घडल्याचं दिसून आले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे बहुतांश आमदार फुटल्याने पक्षाला धक्का बसला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व विचारांशी तडजोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला. त्याचसोबत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेत दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन करूनही एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत शिवसेनेचे ३७ आमदार तर ६ अपक्ष मिळून ४२ आमदारांचे पाठबळ शिंदेंना आहे. तर दुसरीकडे वर्षा बंगला सोडण्याची घोषणा करत उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याच दिवशी सकाळी आमदारांची बैठक वर्षावर बोलावली. या बंगल्यात शिवसेनेचे १५ आमदार उपस्थित होते. तर इतर ३ लवकरच पोहचतील असा दावा करण्यात येत आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, मागील ४ दिवसांपासून महाराष्टात जे राजकीय संकट आहे. कोण इथे गेलेत, कोणी गोव्याला गेलेत, गुवाहाटीला गेलेत या बातम्या येतायेत. शिवसेनेचे २ आमदार कैलास पाटील, नितीन देशमुख हे उपस्थित आहे. त्यातील १ जण सूरतहून आले तर दुसरे गुवाहाटीहून आले. याठिकाणी येताना दोघांना जो संघर्ष करावा लागला, जोखीम पत्करावी लागली तो प्रसंग खूप थरारक आहे. शिवसेनेच्या आमदारांचे अपहरण करून त्यांना नेण्यात आले. या २ आमदारांनी महाराष्ट्राला आणि देशाला सांगावं या राज्यात राजकीय वातावरण कसे आहे. शिंदे गटातील २१ आमदार आमच्या संपर्कात आहे. कितीही फोटो, व्हिडिओ पाठवले तरी मुंबईत ते आल्यावर ते आमच्याकडे येतील. विधानसभेत फ्लोअर टेस्टमध्ये बहुमत आम्ही सिद्ध करू असा दावा राऊतांनी केला.
उद्धव ठाकरेंसोबत असलेले आमदार कोण?
- आदित्य ठाकरे
 - अजय चौधरी
 - रमेश कोरगावकर
 - उदय सामंत
 - वैभव नाईक
 - रवींद्र वायकर
 - उदयसिंह राजपूत
 - संतोष बांगर
 - भास्कर जाधव
 - सुनील राऊत
 - राजन साळवी
 - दिलीप लांडे
 - नितीन देशमुख
 - कैलास पाटील
 - राहूल पाटील
 - सुनील प्रभू
 - प्रकाश फातर्पेकर
 - संजय पोतनीस