Join us

"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:45 IST

उद्धव ठाकरेंवर टीका करताना एकनाथ शिंदे यांनी त्यांची तुलना रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे केली

Eknath Shinde on Uddhav Thackeray: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नसल्याचं म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर दिलं होतं. काही जणांनी भरलेल्या ताटाशी प्रतारणाही केली होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने कधी पाहिला नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

अनेकजण पद मिळण्यासाठी फडफडत असतात, अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत पण भरलेल्या ताटाशी प्रतारणाही केली नाही. ज्यांनी ताट वाढून दिलं त्या पक्षाशी तुम्ही प्रतारणा केली नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मतांची माती करताना देवेंद्र फडणवीसांच्या पाठीतही खंजीर खुपसला, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव घेता ठाकरेंना लक्ष्य केलं.

"दोन दिवसांपूर्वी चर्चा झाली तेव्हा मी काही बोललो नव्हतो. मी अंबादास दानवेंचे अभिनंदन करत होतो. मी आणि अंबादास दानवे सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत. एवढं कुणाला काही लागण्याचे कारण नव्हतं. पावसाळ्यातील बेडकं वगैरे ठीक आहेत पण एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. किती रंग बदलणार? ज्या लोकांना त्यांनी कस्पटासमान समजलं, ते संपलेले लोक आहेत असं म्हटलं. आता त्यांच्याच मागे रोज जात आहेत. माणसाने कसं आणि किती बदलवालं हे बघायला हवं. 'चल मेरे भाई तेरे हाथ जोड़ता हूं' या गाण्याची आठवण आता आल्याशिवाय राहणार नाही. मला बोलायला आवडत नाही. पण काहीजण बाहेर जाऊन मोठ्याने बोलतात," अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

"२०१९ साली शिवसेना भाजपला बहुमत दिलं होतं. जनतेच्या मतांची माती कुणी केली? मतांची माती करताना देवेंद्र फडणवीसांच्या पाठीतही खंजीर खुपसला. निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४० -५० फोन केले. पण त्यांनी एकही उचलला नाही. मी साक्षीदार आहे. २०१७ साली मी देवेंद्र फडणवीसांना सांगितले की मुंबईचे महापौरपद सोडा आणि शिवसेनेला द्या. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी अर्ध्या तासात पत्रकार परिषद घेऊन महापौरपद शिवसेनेला देऊन टाकलं. याची परतफेड २०१९ मध्ये दगाबाजी करुन केली. आम्ही प्रयत्न खूप केले," असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

"जेवढा माझा तिरस्कार कराल तेवढी जनता माझ्या पाठीशी उभी राहिल. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मला माझी जागा दाखवली आणि तुम्हाला तुमची जागा दाखवली. कामाची पोचपावती लोकांनी आम्हाला दिली आहे," असंही एकनाथ शिंदे म्हणाले. 

टॅग्स :विधानसभाएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे