Join us

राष्ट्रवादीचा कोणता नेता अडकणार, चर्चांना उधाण; सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 06:22 IST

विधिमंडळ अधिवेशनाला सुरूवात झाली असताना राष्ट्रवादीला घेरण्याची भाजपची रणनीती असल्याची चर्चाही या निमित्ताने सुरू झाली आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच तुरुंगता दिसेल, असे भाजपच्या नेत्याने केलेले ट्विट आणि त्याचवेळी सिंचन घोटाळ्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नागपूरच्या उच्च न्यायालयाने अद्याप क्लीन चिट दिली नसल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात बुधवारी चर्चेला ऊत आला. 

विधिमंडळ अधिवेशनाला सुरूवात झाली असताना राष्ट्रवादीला घेरण्याची भाजपची रणनीती असल्याची चर्चाही या निमित्ताने सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच सेना नेते संजय राऊत यांच्यासोबत राष्ट्रवादीचा बडा नेता लवकरच तुरुंगात दिसेल, असा दावा भाजपचे मुंबईतील नेते मोहित कंबोज यांनी ट्विटद्वारे मंगळवारी रात्री केला अन् बुधवारी दुपारी सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना अजूनही उच्च न्यायालयाने क्लीन चिट दिलेली नसल्याची बाब समोर आली. 

‘त्यांचा स्ट्राईक रेट १००%’

‘मी अजितदादांच्या त्या केसविषयी बोलणार नाही. सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर सरकार माहिती देईल. पण मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे’, असा दावा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही ‘गेल्या सरकारच्या काळातही सी समरी झालेल्या, केस पुन्हा ओपन करून तपास करण्यात आला. त्यामुळे सिंचन घोटाळ्याच्या चौकशीही मागणी होऊ शकते’, असे म्हटले. यावरून सिंचन घोटाळ्याची फाईल उघडली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गैरव्यवहाराचे आरोप

२०१९ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंचन घोटाळ्याची केस बंद केली. तथापि, उच्च न्यायालयाने वा नागपुरातील विशेष न्यायालयाने अजित पवार यांना निर्दोष ठरविलेले नाही, असे भाजपचे म्हणणे आहे. 

प्लॅन बीची तयारी :

मंत्रिमंडळ विस्तारातील नाराजीमुळे शिंदे गट सरकारातून कधीही बाहेर पडेल, असी भीती भाजपला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर दबाव टाकून त्यांना खेचण्याचा प्लॅन बी भाजपतर्फे आखला जात असावा, अशी शंका घोटाळ्याच्या चौकशीचा पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला.

अधिवेशन असेल त्याच्या आदल्या दिवशी कुठल्या तरी एखाद्या नेत्याच्या नावाने असे ट्विट करायचे आणि विरोधकांना दाबायचा प्रयत्न करायचा. पण विरोधक दबणार नाहीत.     - धनंजय मुंडे, राष्ट्रवादी

फक्त विरोधी पक्षाला टार्गेट करण्यासाठी वारंवार भाजपच्या नेत्यांकडून असे ट्विट केले जातात. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. - एकनाथ खडसे, राष्ट्रवादी

याला सभागृहात व बाहेरही महाविकास आघाडी उत्तर देईल.         - अंबादास दानवे,  विरोधी पक्षनेते, विधान परिषद  

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकार