दहावी-बारावीनंतर कोणती ज्ञानशाखा निवडायची?, करिअर गोंधळ दूर करण्यासाठी मोफत मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:11 IST2026-03-04T12:10:56+5:302026-03-04T12:11:35+5:30
दहावी आणि बारावीनंतर पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, याबाबत अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम असतो.

दहावी-बारावीनंतर कोणती ज्ञानशाखा निवडायची?, करिअर गोंधळ दूर करण्यासाठी मोफत मार्गदर्शन
मुंबई :
दहावी आणि बारावीनंतर पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, याबाबत अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम असतो. या पार्श्वभूमीवर मानसशास्त्रीय कसोट्यांद्वारे मोफत मार्गदर्शन व समुपदेशनासाठी शिक्षण विभागाच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरणाकडून नोंदणी सुरू झाली आहे.
काही विद्यार्थ्यांना स्वतःची आवड, क्षमता आणि योग्य करिअर मार्ग ओळखणे कठीण जाते. योग्य शैक्षणिक संधी निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे एप्रिलमध्ये मानसशास्त्रीय कसोट्यांद्वारे मोफत समुपदेशन केले जाणार आहे. त्याकरिता १४ मार्चपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांची तुकडीनुसार चाचणी, वैयक्तिक समुपदेशन होणार आहे. हे समुपदेशन पूर्णपणे मोफत होणार असून, पालकांनी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या प्राचार्या मनीषा पवार यांनी सांगितले.
नोंदणी कुठे कराल?
प्रादेशिक विद्या प्राधिकरण कार्यालय, एल्फिस्टन टेक्निकल हायस्कूल परिसर, सेंट झेवियर कॉलेजच्या शेजारी, मुंबई महापालिका मुख्यालयाच्या बाजूला, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई.
विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेच्या हॉल तिकीटाची छायांकित प्रत, शाळा आणि घरचा पत्ता, मोबाईल क्रमांक नोंदणीवेळी द्यायचा आहे.
अभ्यासक्रमांबाबत माहिती
विविध ज्ञान शाखांचा पर्याय समजणे सोपे होणार आहे. पाल्याची आवड, अभ्यासक्रम उपलब्धता, आर्थिक बाजू सर्व पैलू समजून घेता येईल. प्रवेश परीक्षा आणि करिअर मार्ग निवडीसाठी समुपदेशन उपयुक्त ठरणार आहे.