तुमच्या राजकारणात आमचे प्रश्न गेले कुठे..? प्रदूषण मुंबईकरांच्या गळ्यापर्यंत; उमेदवार आता तरी लक्ष देणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:17 IST2026-01-02T11:15:31+5:302026-01-02T11:17:02+5:30
...यावरूनच आपले भावी नगरसेवक आपल्या शहरासोबतच नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत किती गंभीर आहेत? याचे चित्र नजरेस येते आहे.

तुमच्या राजकारणात आमचे प्रश्न गेले कुठे..? प्रदूषण मुंबईकरांच्या गळ्यापर्यंत; उमेदवार आता तरी लक्ष देणार का?
मुंबई : निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रदूषणाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या तीन शहरांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून प्रदूषण वाढत आहे. तरीही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने प्रदूषणाच्या मुद्द्याला अग्रस्थान दिलेले नाही. यावरूनच आपले भावी नगरसेवक आपल्या शहरासोबतच नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत किती गंभीर आहेत? याचे चित्र नजरेस येते आहे.
महामुंबईत पायाभूत सुविधांची अनेक कामे सुरू असून, इमारतींचे काम सुरू आहेत. यात बांधकामातून निर्माण होणाऱ्या धुळीने प्रदूषण होत आहे. रेडीमिक्स काँक्रीट प्लांट यात भर घालत आहेत. तसेच शेकोटी पेटवल्याने प्रदूषणात वाढ होते, असे महापालिका सांगत असत असली तरी शेकोटीशिवाय प्रदूषणासाठी इतर घटकही कारणीभूत आहेत. त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
वाऱ्यामुळे धूलिकण मुंबईत
नवी मुंबईत कारखान्यातून प्रदूषणकारी घटक हवेत सोडले जातात. जेव्हा पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहतात, तेव्हा नवी मुंबईतील प्रदूषणाचा परिणाम मुंबईवर होतो. वाऱ्यासोबत वाहून येणारे धूलिकण मुंबईच्या वातावरणात मिसळतात. दरम्यान, लोकसभा, विधानसभेला नागरिकांनी हा मुद्दा लावून धरला. महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तरीदेखील काँग्रेस वगळता एकाही राजकीय पक्षांनी किंवा उमेदवाराने गाठीभेटींमध्ये प्रदूषणाच्या मुद्द्याला हात लावलेला नाही.
नवी मुंबई परिसरातील हवा धोकादायक पातळीवर
कामोठे, रबाळे, महापेसह नवी मुंबईमधील बऱ्याचशा भागात एमआयडीसीचा परिसर आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर कारखाने आहेत.
कारखान्यातून उठणाऱ्या धुरामुळे नवी मुंबईतल्या प्रदूषणातही सातत्याने भर पडत आहे.
डिसेंबर महिन्यात नवी मुंबईमधील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा मध्यम नोंद झाला असून, मध्यम दर्जा नोंदविण्यात येणारे प्रदूषणही धोकादायक आहे.