रेती, सिमेंट, विटा आणल्या कुठून...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 13:41 IST2020-04-25T13:39:08+5:302020-04-25T13:41:06+5:30
संचारबंदीतही अनधिकृत बांधकाम सुरूच

रेती, सिमेंट, विटा आणल्या कुठून...?
पालकमंत्र्यांना ट्विट करत तक्रार
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही लोक निष्काळजीपणे वागत आहेत हे मालाडच्या पी उत्तर परिसरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामामुळे उघडकीस आले. मुख्य म्हणजे कामासाठी लागणारे सर्व साहित्य त्याठिकाणी आणण्यात आले होते. त्यानुसार स्थानिकांनी याबाबत उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर यांना ट्विट केल्यावर सहायक आयुक्तांनी लगेचच कारवाई करत हे काम बंद करविले.
मालाड पश्चिमच्या पाटलादेवी मंदिर परिसरात सोमवार बाजार याठिकाणी काही दिवसांपूर्वी कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानुसार याठिकाणी संचारबंदीचे पालन व्हावे म्हणून पोलीस प्रयत्नशील आहेत. मात्र शुक्रवारी याठिकाणी असलेल्या सुप्रिया चायनीजच्या मागे चाळीवर माळा बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. सर्वत्र लॉकडाऊन असताना लोखंड, विटा, सिमेंट, रेती बांधकामासाठी कशी काय उपलब्ध झाली याबाबत स्थानिकांनी संशय व्यक्त केला. त्यानंतर लगेचच याबाबतचे फोटोसह ट्विट करत पालकमंत्री ते पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे यांना कळविण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घडत असलेला हा प्रकार गंभीर असल्याने कबरे यांनी तातडीने याची दखल घेत याबाबत कारवाई केली आणि त्यानुसार हे बांधकाम थांबविण्यात आले. 'आम्ही काम थांबविले असून याप्रकरणी संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कबरे यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.