लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार डम्पिंग ग्राऊंडची जागा देण्यात येणार आहे. ग्राऊंड साफ करण्यासाठी पालिकेने काढलेल्या २,३६८ कोटी रुपये खर्चाच्या निविदेला उद्धवसेनेने विरोध केला आहे. पण, २००८ मध्ये त्यांची पालिकेत सत्ता असताना डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी ४,५०० कोटींची निविदा काढण्यात आली होती. ते पैसे गेले कुठे? असा सवाल मुंबई भाजप अध्यक्ष व उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना केला.
शेलार पुढे म्हणाले, की धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार येथे देण्यात येणाऱ्या जागेपैकी एक इंचही जागा ‘अदानी’च्या नावावर होणार नाही. धारावीच्या पुनर्विकासामुळे महापालिका आणि राज्य सरकार यांना महसूल मिळणार आहे.
‘उद्धवसेनेने त्यावर काहीच केले नाही’
२००८ मधील निविदेतील त्रुटी पाहून हा निधी वाया जाण्याची बाब भाजपने लक्षात आणून देत त्याला विरोध केला होता. पण, त्याला न जुमानता तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी निविदा मंजूर केली. कमिशन खाल्ले, पुढे काहीच काम केले नाही. एक वर्ष मुंबईतील नव्या बांधकामावर बंदी आणा, असे न्यायालयाने आदेश देईपर्यंत उद्धवसेनेने काहीच केले नाही, असा आरोपही शेलार यांनी केला.