‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 06:56 IST2026-01-02T06:55:43+5:302026-01-02T06:56:14+5:30
भाजपच्या इच्छुक उमेदवार आणि माजी मंडळ अध्यक्ष वृषाली बागवे यांनी थेट व्यासपीठावरूनच जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. माजी खा. गोपाळ शेट्टी आणि आ. मनीषा चौधरी यांच्या उपस्थितीत त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट सवाल केले.

‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
मुंबई : मी कुठे चुकले? जीव तोडून काम केल्यामुळे प्रश्न विचारण्याचा मला हक्क आहे, अशा शब्दांत भाजपमधील इच्छुक महिलेने आपली खदखद व्यक्त केली. दहिसर येथील प्रभाग क्रमांक २ मधून तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिल्याने इच्छुक महिला उमेदवारांनी भाजपच्या मेळाव्यात असंतोष
व्यक्त केला.
भाजपच्या इच्छुक उमेदवार आणि माजी मंडळ अध्यक्ष वृषाली बागवे यांनी थेट व्यासपीठावरूनच जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. माजी खा. गोपाळ शेट्टी आणि आ. मनीषा चौधरी यांच्या उपस्थितीत त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट सवाल केले.
मी दहा वर्षे पक्षासाठी प्रामाणिकपणे दिवसरात्र काम केले. सांगितले ते सर्व केले. मग मी नेमके कुठे चुकले?, असा सवाल कदम यांनी नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात केला. पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे सांगतानाच कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाकडे त्यांनी लक्ष वेधले.
कार्यकर्ता म्हणजे पक्षासाठी सर्वस्व अर्पण करणारा असतो. महिला घरची कामे सोडून, पुरुष नोकऱ्या सोडून पक्षासाठी झटतात. पण, शेवटी त्यांना काय मिळते? खोट्या मुलाखती घेतात. फॉर्म भरून घेतात आणि निष्ठावंतांना डावलतात, असाही आरोप त्यांनी मेळाव्यात केला.
आमचे कुटुंब उच्च शिक्षित आहे. आवड म्हणून राजकारणात आले. मला तिकीट मिळणार असल्याचे दोन दिवस आधी माझा डॉक्टर मुलगा व पतीला पक्षाकडून सांगण्यात आले. मात्र, दोन दिवसांत चक्रे फिरली आणि तेजस्वी घोसाळकर यांना येथून तिकीट दिले. मी नाराज नाही, मी त्यांचा प्रचारही करणार आहे. घरदार सोडून पक्षासाठी जोमाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाबद्दल मी मनातली खदखद व्यक्त केली.
वृषाली बागवे, इच्छुक उमेदवार -