Join us  

... पण, फडणवीसांनी कुठं म्हटलंय तो फोटो मुस्लीम युवतीचा आहे? भाजपाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 7:05 PM

राज्यातील आरोग्ययंत्रणा पुरती कोडमडली आहे. देशात आणि इतरही अनेक राज्य प्रत्येक घटकासाठी पॅकेज देत असताना महाराष्ट्रात मात्र कोणतेही पॅकेज जाहीर झालेले नाही

मुंबई - कोरोनाचा मुकाबला करण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला अपयश येत असल्याचा आरोप करीत आणि कोरोनासंदर्भातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आपापल्या घरी अंगणात उभे राहून घोषणा दिल्या, फलक लावले व सरकारचा निषेध केला. भाजपाच्या या आंदोलनातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल  झाला आहे. काळ्या रंगातील कापडाने तोंड झाकलेल्या महिलेचा हा फोटो असून ही महिला कपाळावरील टिकली काढयचं विसरली काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रश्नास भाजपा नेत्याने उत्तर दिलंय. 

राज्यातील आरोग्ययंत्रणा पुरती कोडमडली आहे. देशात आणि इतरही अनेक राज्य प्रत्येक घटकासाठी पॅकेज देत असताना महाराष्ट्रात मात्र कोणतेही पॅकेज जाहीर झालेले नाही. एवढेच काय, केंद्राकडून जो निधी येतो आहे, तोही खर्च केला जात नाही, असा आरोप फडणवीस यांनी शुक्रवारी आंदोलनादरम्यान केला. राज्यातील अडीच लाख कार्यकर्त्यांनी या ‘मेरा आंगन, मेरा रणांगण’ आंदोलनात भाग घेतला, असे प्रदेश भाजपने म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारने पन्नास हजार कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. 

भाजपच्या आंदोलनावरून समर्थक आणि विरोधकांमध्ये सोशल मीडियातून तुंबळ शब्दयुद्ध रंगले. भाजपच्या नेत्यांना दिवसभर प्रचंड ट्रोल करण्यात आले. शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या घरात भगवा झेंडा फडकावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दाखविले. संकट काळात विरोधकांनी सरकारला सहकार्य केले पाहिजे हा फडणवीस यांचा कोल्हापूरच्या महापुरासंदर्भातील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तर, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आंदोनलतील एक फोटो शेअर करत भाजपाला लक्ष्य केलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर  हँडलवर मुस्लीमसारख्या दिसणाऱ्या महिलेचा फोटो असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच, बहुतेक टिकली चुकून राहिलीय वाटतं? असे म्हणत सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अकाऊंटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. सावंत यांच्या या ट्विटला भाजपा नेते, प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलंय. ''सचिन सावंत आपल्यासारख्या प्रवक्त्याची काँग्रेसमध्ये अजिबात किंमत नाही. तरीही आपण फार आक्रस्ताळेपणा करता. हरकत नाही. कदाचित तो आपला स्वभाव असेल. हा फोटो @Dev_Fadnavis यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर आहे. पण, त्यांनी कुठे म्हटले की तो मुस्लिम युवतीचा आहे?  असा प्रतिप्रश्न केशव उपाध्ये यांनी विचारला आहे. 

दरम्यान, सोशल मीडियावरही या बुरखा घातलेल्या आणि टिकली लावलेल्या महिलेचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यानंतर, सचिन सावंत यांनी हे ट्विट करत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास, भाजपाने उत्तर देताना, प्रतिप्रश्न केला आहे.  

टॅग्स :मुंबईकाँग्रेसभाजपामुस्लीममहाराष्ट्रात कोरोना व्हायरस