मुंबईसारख्या मायानगरीत आजही कित्येक लोकांना स्वच्छ शौचालयाअभावी आजारांना सामोरे जावे लागत आहे. यात मानखुर्द, गोवंडी, कुर्ला, मालवणी आणि धारावीसारख्या झोपडपट्टी परिसरांचा समावेश असून, धारावीत तर अत्यंत वाईट अवस्थेत असलेल्या शौचालयांत नागरिकांना शौच उरकावे लागते. सरकार दरबारी याची अनेकदा गाऱ्हाणी मांडली जात असली तरी काहीच फरक पडत नसल्याचे चित्र असून, आता धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर तरी या अस्वच्छतेतून सुटका होईल, अशी आशा धारावीकरांनी व्यक्त केली आहे.
शौचालयाबाहेर पडलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.प्रजा फाउंडेशनच्या २०२५ मधील रिपोर्टनुसार, धारावीत एक शौचकूप (टॉयलेट सीट) ८६ पुरुष वापरतात, तर महिलांसाठी हेच प्रमाण एका शौचकूपामागे ८१ महिला असे आहे. १० वर्षांनी शौचालयांचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. स्वच्छ भारत मिशनच्या नियमावलीनुसार, शौचकूप जास्तीत जास्त ३५ १ पुरुषांना वापरता येऊ शकेल. तसेच जास्तीत जास्त २५ महिलांसाठी १ शौचकूप आवश्यक आहे. धारावीची ही अवस्था असून, मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरात थोड्याफार फरकाने हीच अवस्था आहे.
टाक्या आहेत, पण पाणी नाही
कित्येक ठिकाणी पाण्याच्या टाक्या असल्या तरी त्यात पाणी नाही. कित्येक दिवस शौचालये साफ होत नाहीत. गोवंडी, मानखुर्दमध्ये कित्येक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
सार्वजनिक शौचालयांचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मात्र बहुतांशी शौचालये जीर्ण आहेत. सार्वजनिक शौचालयांमधील अस्वच्छतेमुळे महिलांची गैरसोय होते. धारावी पुनर्विकासानंतर तरी हे चित्र बदलेल. धारावीतील प्रत्येक घराला स्वतंत्र शौचालय, पुरेसे पाणी, वीज उपलब्ध होईल.विकास रोकडे, रहिवासी
सार्वजनिक शौचालय २४ तास असायला हवे. मात्र पालिकेची मोफत शौचालये रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत बंद असतात. पाण्याची कमतरता, अस्वच्छता, दुर्गंधीमुळे शौचालयात जाणे नकोसे वाटते. ६० फुटांच्या माझ्या घरात स्वतंत्र शौचालय बांधणे शक्य नाही. ही कुचंबणा निमूटपणे सहन करण्यापलीकडे हाती काहीच नाही. आजारी मुलाला सार्वजनिक शौचालयात नेणे जिकिरीचे असल्याने कुटुंबासह पश्चिम उपनगरातील नायगाव येथे स्थलांतर केले.संगीता दळवी, शास्त्रीनगर