शिक्षक भरती प्रक्रियेस गती येणार कधी? अभियोग्यता चाचणी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 09:14 IST2025-10-05T09:14:48+5:302025-10-05T09:14:57+5:30
शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षेसह टीचर एप्टीट्यूड टेस्ट (टॅट) ही परीक्षाही बंधनकारक आहे. मात्र, याचा निकाल जाहीर होऊनही पवित्र पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.

शिक्षक भरती प्रक्रियेस गती येणार कधी? अभियोग्यता चाचणी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य परीक्षा परिषदेने जून २०२५ मध्ये घेतलेल्या बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी (टॅट) ही परीक्षा २,११,३०८ उमेदवारांनी दिली. काही दिवसांपूर्वीच तिचा निकाल जाहीर झाला असून, शंभर टक्के पदभरती कधी होणार, असा सवाल उत्तीर्ण उमेदवार उपस्थित करीत आहेत.
शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षेसह टीचर एप्टीट्यूड टेस्ट (टॅट) ही परीक्षाही बंधनकारक आहे. मात्र, याचा निकाल जाहीर होऊनही पवित्र पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांत नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर पारदर्शक व गुणवत्ताधिष्ठित पद्धतीने शंभर टक्के भरती केव्हा करणार, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
शिक्षण विभागाकडे निवेदन पाठवून पदभरती लांबणीवर न टाकता तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. यासंदर्भात शिक्षण विभागाने २९ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षण आयुक्तांकडे पत्राद्वारे विचारणा केली असून, उमेदवार आता त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहेत, असे शिव युनिटी फाउंडेशनने ‘लोकमत’ला सांगितले. पारदर्शक प्रक्रियेतूनच भरती व्हावी, असे अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण उमेदवार चतुरसिंग साळुंखे यांनी सांगितले.
राज्यात ७५,००० शिक्षकांच्या जागा रिक्त असताना केवळ ८० टक्के पदभरती झाली. त्यानंतर सरकारने २०२२-२३ मध्ये दोन टप्प्यात पदभरतीचे नियोजन केले होते. पहिल्या टप्प्यात २१,००० तर दुसऱ्या टप्प्यात ८,४२२ पदभरती झाली आहे. त्यामुळे हजारो उमेदवारांसाठी आता शंभर टक्के पदभरती लवकर करावी.
प्रा. बलुशा माने, अध्यक्ष,
शिव युनिटी फाऊंडेशन