Join us

कुर्ला रेल्वे स्थानकातील पादचारी पूल पाडणार कधी, बांधणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 17:36 IST

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकातील पादचारी पुलाचे पाडकाम गेल्या दीड महिन्यापासून सुरू

मुंबई :

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकातील पादचारी पुलाचे पाडकाम गेल्या दीड महिन्यापासून सुरू असून, त्याला आणखी २ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या हा पादचारी पूल पाडणार कधी आणि नवीन पूल बांधणार कधी, असा सवाल  आता उपस्थित होऊ लागला आहे.

कुर्ला स्थानकात एकूण ५ पादचारी पूल असून, पाडकाम सुरू असलेला पूल मध्यभागी आहे. या पुलाच्या फलाट क्रमांक १, २, ३ आणि ४ दरम्यानचा भाग कमकुवत झाल्याने तो पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या पुलाच्या काही भागाचे आधीच मजबुतीकरण झाल्याने पुलाच्या पुनर्बांधणीबाबत अद्याप विचार झालेला नसल्याचेही रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कामासाठी मिळतात फक्त दोन तास    कुर्ला स्थानकातील पुलाचे पाडकाम करण्यासाठी रात्री केवळ दीड ते दोन तासांचा कालावधी मिळत असून, विजेच्या तारा आणि पुलाच्या उर्वरित भागाला धक्का न लावता हे काम अतिशय काळजीपूर्वक करण्यात येते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.    दुसऱ्या बाजूला या पुलाच्या पश्चिमेकडील  भागाचे पाडकाम करीत असताना कमकुवत झालेला भाग धोकादायक बनून तो अंगावर पडण्याची भीती आता प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हे पाडकाम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :कुर्लाबेस्टमुंबई