उष्णतेबाबतच्या सूचनांची अंमलबजावणी कधी? पालिकेकडे यंत्रणाच नाही; आदेशाचीही प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 09:00 IST2025-04-03T09:00:16+5:302025-04-03T09:00:34+5:30

Mumbai News: मुंबईसह राज्यातील तापमानाचा वाढता पारा लक्षात घेता राज्य सरकारने सर्व महापालिका आणि नगर परिषदांना उन्हापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत. मात्र, सरकारच्या या सूचना अद्याप अधिकृतरित्या  प्राप्त झालेल्या नाहीत.

When will the heat advisory be implemented? The municipality has no mechanism; it is also waiting for an order. | उष्णतेबाबतच्या सूचनांची अंमलबजावणी कधी? पालिकेकडे यंत्रणाच नाही; आदेशाचीही प्रतीक्षाच

उष्णतेबाबतच्या सूचनांची अंमलबजावणी कधी? पालिकेकडे यंत्रणाच नाही; आदेशाचीही प्रतीक्षाच

 मुंबईमुंबईसह राज्यातील तापमानाचा वाढता पारा लक्षात घेता राज्य सरकारने सर्व महापालिका आणि नगर परिषदांना उन्हापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत. मात्र, सरकारच्या या सूचना अद्याप अधिकृतरित्या  प्राप्त झालेल्या नाहीत. सरकारच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्यावरणीय बदल विभागाकडे मनुष्यबळच नसल्याचे विभागाचे प्रमुख अभियंता अविनाश काटे यांनी सांगितले. 

राज्यातील विविध जिल्ह्यांत सध्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवत असल्याने आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महापालिका आणि नगर परिषदांना आदेश दिले आहेत. 

सर्व रेल्वे, बस स्थानके आणि शॉपिंग मॉलमध्ये येथे सावलीसाठी निवारा आणि थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक प्रथमोपचार पेट्या आणि औषधांची व्यवस्था करावी, रस्त्यावर पाणी शिंपडावे, रुग्णालयात कक्ष स्थापन करावा, उद्याने दुपारी १२ ते ४ या वेळेत खुली ठेवावीत, अशा सूचनांचा यात समावेश आहे. 

यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख अभियंता अविनाश काटे यांनी सांगितले की, सरकारच्या सूचनांचे अधिकृत निर्देश अद्याप मिळाले नाहीत.  

मुंबईत आम्ही नेहमीच काळजी घेतो. आमच्या सर्व रुग्णालयांमध्ये पुरेशी औषधे आणि ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ओआरएस) यांचा साठा आहे. राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत मुंबईत फारशी उन्हाची तीव्रता नसल्याने कुणी रुग्णालयात दाखल होत नाही. मात्र, चक्कर येणे, उन्हाळी लागणे यासारख्या रुग्णांना तातडीने उपचार दिले जातात. नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी या काळात छत्री, टोपी, चष्मा यांचा वापर करावा. उन्हात फिरणे टाळावे. 
- डॉ. दक्षा शाह, आरोग्याधिकारी, 
मुंबई महापालिका

मनुष्यबळाचा अभाव
मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी आमच्याकडे स्वतंत्र मनुष्यबळ नाही. त्यामुळे आम्ही वॉर्डस्तरावर या सूचना पुढे पाठवू आणि त्यांच्यामार्फत काळजी घेतली 
जाईल, असेही अविनाश काटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

Web Title: When will the heat advisory be implemented? The municipality has no mechanism; it is also waiting for an order.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.