बेकायदा स्कूल व्हॅनला आळा कधी? गर्ग यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:31 IST2025-06-09T13:30:31+5:302025-06-09T13:31:05+5:30
School Bus: शालेय विद्यार्थ्यांची घरापासून शाळेपर्यंत ने-आण करण्यासाठी मुंबईमध्ये सहा हजार अधिकृत स्कूल बस सज्ज आहेत, अशी माहिती स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली. मात्र, बेकायदा चालविल्या जाणाऱ्या व्हॅनवर कारवाई होणार का, असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला केला आहे.

बेकायदा स्कूल व्हॅनला आळा कधी? गर्ग यांचा सवाल
- महेश कोले
मुंबई - शालेय विद्यार्थ्यांची घरापासून शाळेपर्यंत ने-आण करण्यासाठी मुंबईमध्ये सहा हजार अधिकृत स्कूल बस सज्ज आहेत, अशी माहिती स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली. मात्र, बेकायदा चालविल्या जाणाऱ्या व्हॅनवर कारवाई होणार का, असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला केला आहे.
खासगी शाळांच्या स्कूल बस सरकारच्या नियमानुसार अद्ययावत करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बसमध्ये महिला मदतनीस असणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बसचालकांची आणि क्लिनरची पार्श्वभूमी, तसेच दर आठवड्याला मद्यपान तपासणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. खासगी व्हॅन, कारमधून विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी गर्ग यांनी केली आहे. ८ मे रोजी बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थ्यांच्या बेकायदा आणि असुरक्षित वाहतुकीला आळा घालण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. परिवहन विभागाने त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे गर्ग म्हणाले.
दंडवसुली, परवाना रद्द : स्कूल बस व्यतिरिक्त इतर वाहनांतून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांची आरटीओकडून तपासणी केली जाते. त्यात दोषी आढळणाऱ्या वाहनांवर आणि चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येतो. तर, काही वाहनांचे परवाने, नोंदणीही रद्द करण्यात येते.
बसमध्ये सुरक्षेसाठी काय
एफएपीएस, व्हेईकल ट्रॅकलिंग लोकेशन डिव्हाइस (व्हीएलटीडी), व्हीआयटीएस, पॅनिक बटन, जीपीएस सिस्टम, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सुरक्षा उपकरणे. शाळा प्रशासन आणि पालकांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांना दर्जेदार सेवा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने चालक, महिला मदतनीस आणि बस व्यवस्थापक.
स्कूल बससाठीचे नियम
स्कूल बसच्या परवान्यासाठी एक हजार रुपये नोंदणी शुल्क. प्रति सीट वार्षिक १०० रुपये शुल्क आरटीओकडे भरावे लागते.
वाहनाचा रंग पिवळा असावा, पुढे व मागे ‘स्कूल बस’ लिहिलेले असावे.
शाळेशिवाय अन्य कोणाचेही कंत्राट असल्यास वाहनाच्या खिडकीखाली सर्व बाजूंना ४०० मिलीमीटर रुंदीच्या पिवळ्या पट्टीने रंगवलेले असावे.
वाहनाच्या खिडकीखाली सर्व बाजूंनी १५० मिलीमीटर रुंदीचा विटकरी रंगाच्या पट्ट्यावर शाळेचे नाव लिहिलेले असावे.