Join us
Daily Top 2Weekly Top 5

"नियुक्ती कधी देणार, मुलांवर वॉचमनकी करायची वेळ"; रोहित पवारांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 13:00 IST

भविष्याचं स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील उमेदवारांनी कष्टाने राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण केली.

मुंबई - राज्य लोकसेवा आयोगामार्फत उत्तीर्ण झालेल्या कृषी खात्यातील २०३ उमेदवारांना गेल्या सहा महिन्यांपासून नियुक्तीच दिली जात नसल्याने त्यांच्यावर रोजगारासाठी शेतीसह इतर ठिकाणी राबण्याची वेळ आली आहे. संयम सुटत असल्याने या उमेदवारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर, आमदार रोहित पवार यांनीही याप्रकरणी लक्ष घातले आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवरुन हा विषय माध्यमांत आणला असून उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्त्या नं देणं ही बाब अत्यंत संतापजनक असल्याचं म्हटलंय. तसेच, युवकांना तात्काळ नियुक्त्या देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

भविष्याचं स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील उमेदवारांनी कष्टाने राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण केली. २०३ उमेदवार परिक्षेअंती निवडीस पात्रही ठरले आहेत. या उमेदवारांची नियुक्ती ही कृषी उपसंचालक तसेच, मंडळ व तालुका कृषी अधिकारी पदावर करण्यात आली. मात्र, अद्यापही उमेदवारांना नियुक्ती न मिळाल्याने उमेदवारांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. आता, आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांना टॅग करत याप्रकरणी विचारणा केली आहे. 

राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेली कृषी खात्याची परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील, तब्बल २०३ उमेदवारांना गेल्या सहा महिन्यांपासून नियुक्ती देण्यात आलेली नाही. राज्यात २,५०,००० पदे रिक्त असताना देखील शासन भरती न काढता एकीकडे तरुणांना हक्काच्या रोजगारापासून वंचित ठेवत आहे. तर दुसरीकडे कष्टाने परीक्षा पास होऊन देखील नियुक्ती देत नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले. तसेच, ही बाब अत्यंत संतापजनक आहे. नियुक्ती न मिळाल्याने आज या गरीब मुलांवर मोलमजुरी, वॉचमन वगैरे इतर कामं करून पोट भरण्याची वेळ आली आहे. शासनाने सर्व विभागातील रखडलेल्या नियुक्त्या तत्काळ देऊन युवकांना न्याय द्यावा, अशी मागणी पवार यांनी केली. 

पालकांनाही लागली काळजी

दरम्यान, राज्याच्या कृषी विभागात मोठा अनुशेष असल्याने त्यांना नियुक्ती देणे सहज शक्य आहे. विशेष म्हणजे १७ ऑगस्ट रोजी या सर्वांच्या दस्तऐवजांची पडताळणीही करण्यात आली. परंतु त्यानंतरही नियुक्तीस टाळाटाळ होत असल्याने या उमेदवारांनी साशंकता व्यक्त केली आहे. उत्तीर्ण उमेदवारांपैकी बहुतांश हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी पोटाला चिमटा देत त्यांच्या शिकवणी, पुस्तके आणि शहराती राहण्यावर खर्च केला. मुलांनी देखील पालकांच्या विश्वासाला सार्थकी लावत परिक्षा उत्तीर्ण केली. मात्र, नियुक्ती नसल्याने त्यांचे पालकही काळजीत पडले आहेत.  

टॅग्स :नोकरीरोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशेती क्षेत्रएमपीएससी परीक्षा