Join us
Daily Top 2Weekly Top 5

योग्य वेळ आल्यावर तलवारही फिरवेन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 09:40 IST

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा, माझगाव येथील महाराणा प्रताप चौकातील महाराणा प्रताप यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी बाहेर पडलेलो नाही. याचा अर्थ मी बाहेर पडायला असमर्थ  आहे असा नाही. मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. तलवार जरी हातामध्ये नसली, तरी ती कशी गाजवायची हे माझ्या नसानसांत भिनले आहे. ज्यावेळी ती फिरवायची वेळ येईल, त्यावेळी  फिरवेनच, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी विरोधकांना इशारा दिला.

माझगाव येथील महाराणा प्रताप चौकातील महाराणा प्रताप यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी त्यांनी भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आजरपणाबद्दल होत असलेल्या टीकेचा समाचार घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आजचा दिवस योगायोगाचा आहे. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा दिवस आहे. त्या काळात या शूरवीरांनी जे केले, चेतना जागवली, त्याच पद्धतीने बाळासाहेबांनी चेतना जागवली. या शूरवीरांप्रमाणे आपल्याला होता येणार नाही. पण, किमान त्यांच्या चेतक या घोड्याप्रमाणेच धन्याच्या प्राणरक्षणासाठी जीवाची बाजी लावणारा जीवलग सवंगडी होता आले, तरीही पुरेसे आहे. त्यादृष्टीने आपण या थोर शूरवीरांचे, त्यांच्या पराक्रमाचे आपल्याला पुजारी होता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

कामातून दाखवले !वीर महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाविषयी कुणी सांगायची गरज नाही. प्रेरणा, चेतना कुणाकडून घ्यायची, हे आणि नेमका कुणाचा वारसा आपल्याकडे आहे. कुणाचा वारसा आपण पुढे घेऊन जाणार आहोत, हे हा पुतळा उभ्या करण्याच्या कामातून आपण दाखवून दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :उद्धव ठाकरेभाजपाशिवसेना