Join us  

'बाळासाहेब असताना राज्याचं राजकारण मुंबईतून घडत होतं; परंतु आता...'; राऊतांचं विधान

By मुकेश चव्हाण | Published: October 31, 2020 1:39 PM

अनेक काळ देशाचं आणि राज्याचं राजकारण मुंबईतून घडत होते.

मुंबई/ पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सरकारमधील ज्येष्ठ नेते आहेतत. त्यामुळे ते सर्वांना मार्गदर्शन करतात. जर सरकार शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते, असा सवाल खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत बोलत होते.

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तेव्हा सरकारमधील जेष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करत आहेत. तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात, सल्ला देतात. शरद पवारांचा सल्ला घेतला नाही तर आमच्यासारखे करंटे आम्हीच असं म्हणत, राज्यपालांनाही शरद पवारांच्या सल्ल्याची गरज आहे. त्यामुळं मी शरद पवारांना विनंती करेन की त्यांनी राज्यपालांनाही सल्ला द्यावा, असा टोला संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लगावला आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की,  महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदु पुणे राहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे होते तो पर्यंत मुंबईत होतं. अनेक काळ देशाचं आणि राज्याचं राजकारण मुंबईतून घडत होते. पंरतु आता सगळे प्रमुख लोक पुण्यात आहेत, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे. 

...तर राज्याच्या ऐक्यासाठी धोकादायक

मराठा आरक्षणाचं राजकारण कोणी करत असेल तर राज्यासाठी घातक आहे. राज्य एकजूट आहे म्हणून महाराष्ट्र आहे, राजकारणासाठी याचा गैरफायदा काहीजण घेऊन सामाजिक एकोपा बिघडवू नये, राज्याच्या ऐक्याला धक्का पोहचवत आहे, भाजपा नेत्यांनी पंतप्रधानांकडे जाऊन आरक्षणाचा मुद्दा सोडवू शकता, त्याचे श्रेय तुम्ही घ्या, सगळेजण आम्ही एकत्र येऊ, कायदेशीर बाबी आणि न्यायलयीन बाबीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत असं अप्रत्यक्षरित्या राऊतांनी भाजपावर निशाणा साधला.  

देवेंद्र फडणवीस यांचे भविष्य उज्ज्वल

विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संवाद असायला हवा, पण कुठेतरी हा संवाद थांबला आहे, हे राज्य आमचं आहे अशी भावना विरोधकांची असायला हवी, सत्ता गेली तर राज्याची दुश्मनी करता येणार नाही, सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार विरोधकांना आहे. पण राज्याच्या बेईमानी करू नका, देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय अनुभव वाढत चालला आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊ आलं नाही, ध्यानीमनी नसताना सत्ता गेली त्याचा धक्का अजून पचवू शकले नाहीत. त्यातून देवेंद्र फडणवीसांनी बाहेर पडावं भविष्य उज्ज्वल आहे असा चिमटा संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना काढला आहे.  

शिवसेनेला कोणीही हिंदुत्व शिकवू नये

आमचं हिंदुत्व राजकीय नाही, घंटा बडवली अने शेंडी ठेवली म्हणजे हिंदुत्व नाही. शिवसेनेची चळवळ मराठी माणसाची जोडली आहे. आम्ही राजकारणात पदं मिळावी म्हणून आलो नाही, ही चळवळ वाढली पाहिजे, महाराष्ट्राच्या गावागावात पोहचली पाहिजे यासाठी आम्ही काम केले. शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये, आजही आक्रमकपणे आम्ही हिंदुत्व मांडतो, एक वर्षापूर्वी आमच्या हिंदुत्वावर भाजपला शंका नव्हती, राजकारणात जे ठरवून येतात ते कधी टिकत नाही, विचारांशी प्रामाणिक राहा, विचार बदलल्याने काही साध्य नाही. 

बाळासाहेब ठाकरे कसे निर्माण झाले हे नव्या पिढीला कळावं म्हणून ठाकरे सिनेमा काढला,  सत्ता येण्यासाठी ज्यांनी हातभार लावला त्यांच्याविषयी शिवसैनिकांच्या मनात कटुता नाही, आता सगळेच मूळ शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरे नेहमी विरोधकांचे ऐकायचे, त्यांच्यासोबत चर्चा करायचे, हीच परंपरा महाराष्ट्राची आहे, काँग्रेस असो शरद पवार असो सगळ्यांनी ही परंपरा कायम राखली आहे, संवाद राखणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, राजकारणासाठी आम्ही हिंदुत्वाचा वापर केला नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाबाळासाहेब ठाकरेमहाराष्ट्र सरकारमुंबईपुणे