Join us  

एसटीचे चाक रुतलेलेच! बोलणी ठप्प, तिढा कायम; कर्मचारी विलीनीकरणावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 6:59 AM

महामंडळाने चालविल्या खासगी गाड्या

मुंबई: कर्मचारी संघटना आणि राज्य सरकार त्यांच्या भूमिकांवर ठाम असल्याने एसटी संपाचा तिढा चौथ्या दिवशीही कायम राहिला. कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणासाठी आंदोलन सुरूच ठेवले असून परिवहन विभागाकडून एसटी आगारनिहाय एकूण दोन हजार खासगी बसगाड्या चालविण्यात आल्या. मात्र त्यानंतरही दिवाळीनंतर आपापल्या घरी परतणाऱ्यांचे हाल थांबलेले नाहीत.

एसटी महामंडळाने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सर्व प्रतिवाद्यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी दिलेली मुदत शुक्रवारी संपणार आहे. त्यानंतर काय होणार, याकडे आता लक्ष लागले आहे. काही ठिकाणी शिवशाही बस व खासगी प्रवासी गाड्यांवर दगडफेक झाल्याने कामावर येणारे एसटी कर्मचारी आणि खासगी बसगाड्यांना सुरक्षा तसेच वाहक-चालकांना सुरक्षा देण्याची हमी परिवहन मंत्री अनिल परब यांनी खासगी वाहतूकदारांना दिली. प्रत्येक जिल्ह्यात नोडल ऑफिसरची नेमणूक करण्यात येणार आहे.  

कर्मचाऱ्यांनी खासगी बसगाड्यांवर दगडफेक केली होती, तसेच बसच्या वाहक-चालकांना मारण्याचा घटना घडल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी खासगी बस विनाप्रवासी परत आल्या. त्यातून खासगी वाहन चालकांचे आर्थिक नुकसान झाले. परिणामी गुरुवारी सकाळी १० वाजेपासून पुणे व राज्यातील इतर ठिकाणी खासगी बस एसटी स्थानकाच्या आवारातून सोडण्याचा निर्णय मागे घेण्यात आला.

तीन दिवसांत दोन हजार कर्मचारी निलंबित

एसटी शंभर टक्के बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. परिणामी संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने मंगळवारपासून कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी १,१३५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. आतापर्यंत २,०५३ एसटी कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

येणाऱ्या कर्मचाऱ्यांची आगाराबाहेर अडवणूक

कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची आगाराबाहेर अडवणूक होत असल्याने अनेक कर्मचारी भीतीपोटी कामावर रुजू होत नसल्याने त्यांना सुरक्षा देण्याबाबत पोलीस आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. बैठकीत परिवहन मंत्री अनिल परब व सर्व संघटनांचे प्रतिनिधी, पोलीस महासंचालक, परिवहन आयुक्त, एसटीचे संचालक उपस्थित होते.

सफाळे येथे चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पालघर तालुक्यातील सफाळे आगारातील चालक चतुर सूर्यवंशी यांनी बुधवारी रात्री विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना केईम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थीर आहे. पालघर जिल्ह्यात व आगारातील अशी ही पहिलीच घटना असून एकच खळबळ उडाली आहे. याबाबत घटनेची नोंद सफाळे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :एसटी संपमहाराष्ट्र सरकारउद्धव ठाकरेअनिल परब