बेस्टचं चाललंय काय? सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह; मुंबईकर प्रवाशांच्या जीवाशी खेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 08:47 IST2025-04-22T08:47:10+5:302025-04-22T08:47:25+5:30
बेस्टच्या मालकीच्या बसचे १३३, तर भाडेतत्त्वावरील बसच्या ११४ अपघातांची नोंद आहे. आता त्यात आणखी भर पडल्याची माहिती आता समोर येत आहे.

बेस्टचं चाललंय काय? सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह; मुंबईकर प्रवाशांच्या जीवाशी खेळ
मुंबई : मागच्या आठवड्यात बेस्टच्या दोन ई-बसेसच्या दुर्घटना झाल्या. एका बसला चर्चगेट स्थानकाबाहेर आग लागली, तर दुसरी डिव्हायडरला जाऊन धडकली. या दुर्घटना म्हणजे बेस्ट प्रवाशांच्या जीवाशी खेळ असून, ई-बसबद्दलच्या तक्रारींवर उपाययोजना करण्याऐवजी बेस्ट प्रशासनाचे नक्की काय सुरू आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या अपघातांमुळे पुन्हा एकदा बेस्टच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुंबईबरोबरच महामुंबईतील काही भागांपर्यंत धावणाऱ्या बेस्ट बसमधील दररोजच्या प्रवाशांची संख्या ३२ ते ३३ लाखांच्या घरात आहे. या प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या बस पुरवण्यासह बसची संख्या वाढवण्यावरही भर दिला जात आहे. मात्र, २०२२ ते २०२४ या तीन वर्षांत बेस्टचे २४७ अपघात झाले असून, सर्वाधिक अपघात हे स्वमालकीच्या बसचे झाले आहेत. त्यात बेस्टच्या मालकीच्या बसचे १३३, तर भाडेतत्त्वावरील बसच्या ११४ अपघातांची नोंद आहे. आता त्यात आणखी भर पडल्याची माहिती आता समोर येत आहे. याबाबत माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी बेस्ट प्रशासनाला जाब विचारला आहे.
कुर्ला बस अपघातानंतर बेस्टच्या ताफ्यातील ई-बसेसच्या अंतर्गत तक्रारी, त्यामुळे होणारे अपघात आणि याशिवाय चालक-वाहकांच्या विरोधातील तक्रारी नव्याने समोर आल्या आहेत. या इलेक्ट्रिक बस अपघातांची मालिका थांबतच नसून बेस्टच्या खासगी बस या प्रकाराला कारणीभूत ठरत आहेत का? असा सवाल केला जात आहे.
बेस्टकडून भाडेतत्त्वावरील ८५ कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग
कुर्ला अपघातानंतर बेस्ट उपक्रमाकडून भाडेतत्त्वावरील वाहकचालकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत सहा बॅचमधील ८५ चालकांना हे तीन आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यात बेस्ट उपक्रमातील कायम सेवेतील चालकच त्यांना मार्गदर्शन करत आहेत.
सध्या प्रशिक्षणासाठी इव्ही ट्रान्सकडून देण्यात आलेल्या १२ मीटर ई-बस वापरण्यात येत असून, ती ड्यूअल-कंट्रोल बस आहे. ही बस दोन ब्रेक सिस्टीमसह सुसज्ज असून, त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान बसवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळते. ही बस विशेष प्रशिक्षणासाठी आरटीओकडून मान्यताप्राप्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
चालक प्रशिक्षित आहे ना?
कंत्राटी बसचालक बेफिकीर होऊ लागले असून ते नक्की प्रशिक्षित आहेत का? असा प्रश्नही आता सामान्य मुंबईकर प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहेत. या सर्व प्रकारामुळे एकेकाळी मुंबईकरांचा अभिमान असलेल्या बेस्ट बसची जणू भीतीच प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे.