काय चाललेय? आताही पुरवले कमी पेपर; उपाययोजनाही सुरू; शिक्षण विभागाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 10:19 IST2025-10-10T10:19:00+5:302025-10-10T10:19:09+5:30
मुंबईतील पश्चिम, पूर्व व उत्तर अशा तिन्ही विभागातील विविध अर्बन रिसोर्स सेंटर (युआरसी) मधील अनेक शाळांमध्ये प्रश्नपत्रिका पोहोचल्या. पण, बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी संख्येपेक्षा प्रश्नपत्रिका कमी मिळाल्या आहेत, असे शिक्षकांनी सांगितले.

काय चाललेय? आताही पुरवले कमी पेपर; उपाययोजनाही सुरू; शिक्षण विभागाची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पॅट परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे. परंतु, महानगरातील अनेक ठिकाणी शाळेतील विद्यार्थी संख्येनुसार प्रश्नपत्रिका पुरेशा पोहोचल्या नाहीत़. त्यामुळे पॅट परीक्षा प्रश्नपत्रिकांचा गाेंधळ सुरूच असल्याचे चित्र असून, शाळा शिक्षक, मुख्याध्यापक हैराण झाले आहेत. मात्र, या समस्येवर उपाययोजना सुरू असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील पश्चिम, पूर्व व उत्तर अशा तिन्ही विभागातील विविध अर्बन रिसोर्स सेंटर (युआरसी) मधील अनेक शाळांमध्ये प्रश्नपत्रिका पोहोचल्या. पण, बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी संख्येपेक्षा प्रश्नपत्रिका कमी मिळाल्या आहेत, असे शिक्षकांनी सांगितले. महापालिका शिक्षण विभाग आणि उपसंचालक शिक्षण विभाग यावर उपाययोजना करीत आहेत. महापालिका शिक्षण विभागात अनेक अधिकारी अनुभवी असताना गोंधळ का व्हावा? असा प्रश्न राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे चिटणीस विजय पाटील यांनी विचारला आहे. शिक्षक स्वतःच्या खर्चाने अपुऱ्या प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स करतात, तरीही पर्यवेक्षक यंत्रणा मौन बाळगते, असे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष विजय कोंबे यांनी सांगितले.
३ हजार शाळांत परीक्षा
महापालिका आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत ३ हजार शाळांमध्ये ४ लाख विद्यार्थी पॅट परीक्षा देत आहेत.
या परीक्षेचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळीचे मूल्यमापन करून शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याचा आहे.
विद्यार्थ्यांमधील भाषिक कौशल्य, गणितीय तर्कशक्ती, वाचन - लेखन किती झाले आहे ते परीक्षेमधून समजून येते, असे (एससीईआरटी) म्हटले आहे.
प्रश्नपत्रिका काही ठिकाणी थोड्या कमी पडल्या, अशी तक्रार काही शाळांनी केली असून उपाययोजना सुरू आहे.
- उपशिक्षणाधिकारी, समग्र शिक्षा अभियान महापालिका