हल्लेखोर निसटला तेव्हा सुरक्षा कर्मचारी कोणत्या कामात होते? प्रवाशांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 09:41 IST2026-01-26T09:37:42+5:302026-01-26T09:41:23+5:30
Malad Crime News: पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकात थांबलेल्या लोकलच्या दरवाजात तरुणाने प्राध्यापकाची चाकू हल्ला करून हत्या केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून हल्लेखोर अलगद निसटून जाताना दिसत आहे.

हल्लेखोर निसटला तेव्हा सुरक्षा कर्मचारी कोणत्या कामात होते? प्रवाशांचा सवाल
मुंबई - पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकात थांबलेल्या लोकलच्या दरवाजात तरुणाने प्राध्यापकाची चाकू हल्ला करून हत्या केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून हल्लेखोर अलगद निसटून जाताना दिसत आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून हल्लेखोर पळून जाताना सुरक्षा कर्मचारी होते कुठे? असा संतप्त सवाल आता प्रवासी करत आहेत.
शनिवारी सायंकाळी मालाड रेल्वेस्थानकावर झालेल्या एका क्षुल्लक वादातून ३३ वर्षीय महाविद्यालयीन प्राध्यापकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्लॅटफॉर्म आणि लोकलमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था व नियमित गस्त असती, तर ही घटना टाळता आली असती, असा प्रवाशांचे म्हणणे आहे. रेल्वे पोलिस आणि आरपीएफकडून सुरक्षा व्यवस्थेकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे अशा घटनांमध्ये वाढ होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली.
अनेक स्थानकांवर प्रवेशद्वारांवरील सुरक्षा तपासणी ढिसाळ असून, मेटल डिटेक्टर अनेक ठिकाणी बंद अवस्थेत आहेत. काही महिन्यांपूर्वीही पश्चिम व मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील सुरक्षेतील त्रुटी उघड झाल्या होत्या; मात्र, परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही, याकडे प्रवाशांनी लक्ष वेधले.
सीसीटीव्हीत काय आले समोर
१. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की ओंकारने हल्ला केला आणि मग गर्दीचा फायदा घेत तो पळून गेला. मालाड रेल्वे स्थानकावर स्लो लोकल ट्रेन स्थानकात दाखल होत असताना दोन प्रवाशांमध्ये वाद झाला.
२. वादातून ओंकार शिंदे याने आलोक कुमार सिंग यांच्यावर धारदार वस्तूने हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी शिंदे लोकलधून उतरून प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून बोरीवलीच्या दिशेने पळ काढताना दिसला.
३. खुनाच्या घटनेनंतर तो प्लॅटफॉर्मवरील मधल्या फूटओव्हर ब्रिजवर चढून पूर्वदिशेकडे पळत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून उघड झाले. या घटनेनंतर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली. ही बाब लक्षात येताच आरपीएफ, एमएसएफ, जीआरपीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.