मुंबई - काँग्रेस आणि विरोधकांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा सातत्याने चालवलेला अपमान बंद करावा, जर निवडणुकांवर टीकाच करायची असेल तर प्रथम विधानसभेचा राजीनामा द्यावा, असे आव्हान भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिले आहे. लोकांनी मतपेटीतून दिलेला जबरदस्त धक्का काँग्रेस आणि माविआला पचवता आलेला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांनी काँग्रेस आणि विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. ते म्हणाले की, आता मतदार याद्यांवर आणि मतदान प्रक्रियेवर गळे काढणाऱ्या विरोधकांनी, विशेषतः काँग्रेसने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यावर त्यावर आक्षेप घेतला नव्हता. निवडणुक आयोग त्यांची बाजू मांडेल परंतु जेव्हा मतदार याद्या आक्षेपांसाठी प्रारूप याद्या जाहीर झाल्या, तेव्हा विरोधकांनी काहीच केले नाही. तेव्हा केवळ ३९०० आक्षेप दाखल झाले होते त्यातील केवळ ९८ आक्षेप वैध ठरले होते, अशी माहितीही माझ्याकडे आहे.
आशिष शेलार पुढे म्हणाले की, माविआ आणि काँग्रेस जे सांगत आहेत की शेवटी मतदान वाढले, त्यांनी दिवसभराची दर तासाची आकडेवारीही सांगावी, ती का लपवली जाते, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते, त्यानुसार लोकांनी अधिकाधिक संख्येने मतदान केले यात चूक काय? असे विचारून आशिष शेलार म्हणाले की मतदान वाढले तरी यांची तक्रार असते, मतदार याद्यांची स्वच्छता केली तरी रडतात, हा दुतोंडीपणा माविआने आधी बंद केला पाहिजे. त्यात पुन्हा वाढलेल्या मतदानाचा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत फायदा झाला तर तो चालतो, पण विधानसभा निवडणुकात त्यांना लोकांनी नाकारलं तर ते मात्र चालत नाही, याचे आश्चर्य वाटत, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.