हा कसला राम? हा तर रावण...! सोशल मीडियावर राम कदम यांच्यावर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 02:57 IST2018-09-06T02:57:21+5:302018-09-06T02:57:38+5:30
मुलगी पसंत असेल तर पळवून आणायचेही काम करून देतो, असे आश्वासन देणारे भाजपाचे घाटकोपर येथील आमदार राम कदम यांच्यावर सध्या सोशल मीडियावरही टीकेची झोड उठली आहे.

हा कसला राम? हा तर रावण...! सोशल मीडियावर राम कदम यांच्यावर टीकास्त्र
मुंबई : मुलगी पसंत असेल तर पळवून आणायचेही काम करून देतो, असे आश्वासन देणारे भाजपाचे घाटकोपर येथील आमदार राम कदम यांच्यावर सध्या सोशल मीडियावरही टीकेची झोड उठली आहे. त्यांच्यावर विविध प्रकारचे विनोद आणि व्यंगचित्रे तयार केली जात आहेत. एकूणच फुकट शायनिंगमुळे कदमांचे पुरते वस्त्रहरण झाले आहे.
‘अवघ्या चार वर्षांतच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे ‘बेटी उठाओ, बेटी भगाओ’चा प्रवास झाला. हा कसला राम? हा तर रावण! रामच भाजपाला वनवासात पाठविणार.... अशा विविध टपल्या सोशल मीडियातून कदमांना दिल्या जात आहेत. विशेषत: युवती आणि महिलांनी एकतर्फी पळवापळवीच्या मामल्यावर तिरकस प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. एक मुलगा मला आवडतो, मी त्याला प्रपोज केला; पण तो नाही म्हणाला. माझ्या घरच्यांनाही तो पसंत आहे, त्याला पळवून आणणार का, असा प्रश्न काही मुलींनी केला आहे. तर, कदमांनी मुलींसाठीसुद्धा सेवा सुरू कराव्यात आणि मुलगा पळविण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा अशी समस्त विवाहोच्छुक महिलांची मागणी असल्याची पोस्ट अनेक युवतींनी टाकली. तिरकस विनोद आणि टपल्यांच्या माध्यमातून त्यांच्या विधानाची धुलाई सुरू आहे.
विविध प्रसंगांचे विनोद, व्यंगचित्रांनाही ऊत आला आहे. ‘शिवडे, कदमाच्या राम्याला सांगू का?’ असा प्रश्न असलेले बॅनरे झळकत आहेत. ‘होम मिनिस्टर’फेम आदेश भाओजींचा नवीन प्रश्न : तुमचे अरेंज्ड मॅरेज आहे? लव्ह मॅरेज आहे की कदम मॅरेज? असा प्रश्न विचारला जाणार असल्याचे सोशल मीडियाने जाहीर केले आहे. तर, चाळिशीतल्या अनेकांनी आमच्या तरुणपणी राम कदमांसारखे आमदार का नव्हते? असे मेसेज फॉरवर्ड केले आहेत.