Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेवर ठाम राहिल्यास भाजपाचं पुढचं पाऊल काय?; रावसाहेब दानवे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 15:56 IST

मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार आणि त्याचा शपथविधी शिवतिर्थावर होईल असा विश्वास देखील शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज  पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता. 

मुंबई: राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटल्यानंतर देखील सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे. शिवसेनेनं ठरल्याप्रमाणे सत्तेत 50-50चा आग्रह धरत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचीही मागणी केली होती. परंतु शिवसेनेची ही मागणी धुडकावून अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद देण्याबाबत कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. यानंतर शिवसेना दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसून येत आहे. त्यातच मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार आणि त्याचा शपथविधी शिवतिर्थावर होईल असा विश्वास देखील शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज  पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता. 

शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेवर ठाम राहिल्यास भाजपाचं पुढचं पाऊल काय असणार असा प्रश्न भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांना एका मराठी वृत्तवाहीनीवर विचारण्यात आला होता. यावर दररोज परिस्थिती बदलत असते आणि बदलत्या परिस्थितीमध्ये कोणतं पाऊल टाकावं लागेल याचं उत्तर आज मिळू शकणार नाही. त्यामुळे परिस्थिती जशी बदलेलं तसं भाजपाकडून पाऊल टाकलं जाईल असं रावसाहेब दानवे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आम्ही निवडणुकीत एकत्र लढलो तसचं सरकार देखील एकत्र मिळून स्थापन करावं असं भाजपाचं मत असल्याचे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल आणि शिवतीर्थावर शपथविधी संपन्न होईल, असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. भाजपासोबतच्या चर्चेस शिवसेनेकडून कोणतीही अडचण नाही. खोटं बोलणारी, टोपी फिरवणारी मंडळीच चर्चेतला प्रमुख अडथळा आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी भाजापवर तिखट शब्दांत निशाणा साधला होता. उद्धव अंतिम निर्णयापर्यंत आले असून आमचं गणित जमल्यावर ते माध्यमांसमोर मांडू, असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :रावसाहेब दानवेउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपादेवेंद्र फडणवीस