क्रिकेट अन् अहमदाबादचा काय संबंध? T20 World Cup वेळापत्रकावरून आदित्य ठाकरेंचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:10 IST2025-11-26T13:09:48+5:302025-11-26T13:10:25+5:30
Aaditya Thackeray on T20 World Cup 2026 Final at Ahmedabad: टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे आयोजन गुजरातमधील अहमदाबादच्या मैदानावर केल्यावरून त्यांनी पक्षपाती राजकारणाचा आरोप केला आहे.

क्रिकेट अन् अहमदाबादचा काय संबंध? T20 World Cup वेळापत्रकावरून आदित्य ठाकरेंचा संताप
Aaditya Thackeray on T20 World Cup 2026 Final at Ahmedabad: भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या वेळापत्रकावरून काही अंशी वाद निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (ICC) टीका केली. टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे आयोजन गुजरातमधील अहमदाबादच्या मैदानावर केल्यावरून त्यांनी पक्षपाती राजकारणाचा आरोप केला आहे. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये प्रश्न उपस्थित केला की, पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मुंबईला स्थान का देण्यात येत नाही. अहमदाबाद आणि क्रिकेटचा संबंध काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरेंची बोचरी टीका
आदित्य ठाकरे म्हणाले, "टी२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. अंतिम सामना कुठे होणारे? अहमदाबाद! प्रत्येक अंतिम सामना तिथे आयोजित करण्याची क्रेझ काय आहे? ते पारंपारिक क्रिकेट स्थळ आहे का? त्याचा क्रिकेटशी संबंध काय? मुंबई का नाही? वानखेडे टी२० विश्वचषक फायनलसाठी सर्वोत्तम ठिकाण असू शकते. २०११ आठवते का? (भारत जिंकला होता) आणि अहमदाबाद स्टेडियमने आधीच विश्वचषक फायनलचे आयोजन केले आहे. आशा आहे की, आयसीसी राजकारण आणि पक्षपात करणार नाही."
So the T20 World Cup fixture is out.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 25, 2025
Guess where the Final is scheduled?
Ahmedabad.
What’s this fascination of pulling every single final there? Has this been a traditional cricket venue?
Why not Mumbai?
Wankhede will be the absolute best venue for a T20 World Cup final.… pic.twitter.com/thezl9QIz0
"भारतातील इतर ठिकाणे देखील अंतिम सामना आयोजित करण्यास सक्षम आहेत. ईडन गार्डन्स (कोलकाता), एमए चिदंबरम स्टेडियम (चेन्नई), आयएस बिंद्रा स्टेडियम (मोहाली) ही सर्व ठिकाणे टी२० विश्वचषक अंतिम सामना आयोजित करण्यासाठी ठिकाणे उत्तम आहेत. परंतु अचानक पक्षपाती राजकारणामुळे मुंबई आणि इतर स्टेडियमवर अन्याय होत आहे," असा आरोप त्यांनी केला.
वानखेडे आणि मोदी स्टेडियमची तुलना
दक्षिण मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये ३३,५०० लोक बसण्याची क्षमता आहे. तर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एकाच वेळी १ लाख ३२ हजार क्रिकेट चाहते बसू शकतात.
दरम्यान, ही स्पर्धा पुढील वर्षी ७ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि फायनल ८ मार्चला होईल. सामने दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, मुंबई, कोलंबो आणि कँडी येथे खेळवले जातील. या स्पर्धेत एकूण ५५ सामने खेळवले जातील. एकूण २० संघ यात खेळतील.