Join us

आदळ-आपट करुन फायदा काय? कुटुंबावरील टीकेनंतर शिंदेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 21:54 IST

ठाकरे-फडणवीसांचा गेल्या काही दिवसांतील वाद कुटुंबापर्यंत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला. "कुटुंब फडणवीसांनाही आहे. त्यांच्या कुटुंबातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट बाहेर येत आहेत. आम्ही अद्याप त्यावर बोललेलो नाही. जर फडणवीसांच्या कुटुंबावर बोलावं लागलं, तर त्यांना केवळ शवासन करावं लागेल. त्यांना वेगळी कोणतीही आसनं झेपणार नाहीत. केवळ शवासन, फक्त पडून राहावं लागेल. योगा डे" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक टोला लगावला. याला आता देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे-फडणवीसांचा गेल्या काही दिवसांतील वाद कुटुंबापर्यंत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यावर, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी भाष्य केलंय. 

गेल्या वर्षभरात संस्कृती, मर्यादा, पातळी सगळंच सुटलेलंय. आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय, पण सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर जे आरोप लावले जात आहेत, जे लांच्छनास्पद बोललं जातंय, पातळीसोडून बोललंत जातयं ते सर्वांनाच माहितीय. पण, परिवाराला राजकारणात ओढणं हे अतिशय दुर्दैवी आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेवर नाराजी व्यक्त केली. तसेच, आज देवेंद्रजींच्या सौभाग्यवतींचा जो उल्लेख झाला, तो करायला नको होता. गेल्या २-३ महिन्यांपूर्वी आमचा नातू रुद्रांक्ष याच्यावरही टीका केली होती, असेही शिंदेंनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस हा माणूस मोठ्या मनाचा आहे, मी त्यांना १५-२० वर्षांपासून ओळखतो. त्यांनी कितीतरी वेळा माजी मुख्यमंत्र्यांना मदत केलीय. मोदींनीही मदत केलीय. देवेंद्रजींसोबत मी काम केलंय. तुम्ही त्यांच्यावर कसले आरोप करता. अशाप्रकारे आरोप-प्रत्यारोप सुरू राहिले तर राज्यात वाईट परिस्थिती निर्माण होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले. मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारावर बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.  

कोरोना काळात माणसं मरत असताना, मृतदेहासाठी लागणारी बॅग  ५०० रुपयांची ती बॅग ५ हजार रुपयांना घेतली. मग, याची चौकशी होणारच. कॅगच्या आधारावर ईडीकडून ही चौकशी सुरू असून राज्य सरकारचा यात कुठलाही हस्तक्षेप नाही. कर नाही, त्याला डर कशाला... तुम्ही काही केलं नसेल तर चौकशीली सामोरे जावा, ही असली आदळ-आपट का करताय, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना केला. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

"मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका" असं म्हणत फडणवीसांनी निशाणा साधला आहे. मुंबईला कुणी लुटले, मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले, मराठी माणसाला कुणी ओरबाडले?, 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते?" याची चिंता करा असं म्हटलं आहे. तसेच "तुमची हास्यजत्रा चालू द्या... बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…" अस म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस