७ माणसं मेली म्हणून काय झालं? मागे एक मोठे अनधिकृत होर्डिंग कोसळले...
By अतुल कुलकर्णी | Updated: December 11, 2024 09:52 IST2024-12-11T09:51:37+5:302024-12-11T09:52:36+5:30
मागे एक मोठे अनधिकृत होर्डिंग कोसळले. त्यात १७ जणांचे जीव गेले. ८० जखमी झाले. तेवढ्यापुरती चर्चा झाली. पुढे, बेकायदेशीर होर्डिंग्जच्या विरोधातली मोहीम थंडावली.

७ माणसं मेली म्हणून काय झालं? मागे एक मोठे अनधिकृत होर्डिंग कोसळले...
- अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बेस्टच्या बसचालकाने कुर्ला परिसरात ७ बळी घेतले. ३८ जखमींवर उपचार सुरू आहेत. काही काळ अधिकारी दुःखी चेहऱ्याने प्रतिक्रिया देतील, माध्यमांमधून दोन दिवस ओरड होईल, नंतर काहीच घडले नाही, अशा वृत्तीने सगळे नियम धाब्यावर बसवून मुंबईला वाट्टेल तसे ओरबाडणे सुरूच राहील. यानंतर कोणी वाहतुकीला शिस्त लावणे, मोकाट फेरीवाल्यांना दंड करणे किंवा वाट्टेल तिथे गाड्या उभ्या करणे थांबणार नाही.
मुंबईत वेगवेगळ्या स्मशानभूमीत रोज शंभर दीडशे मृतांवर अंत्यसंस्कार होतात. तिथे सात जणांचे काय? असा कोडगेपणा कोणी दाखवला तर आश्चर्य वाटू नये. रात्री मुंबईत फेरी मारली तर रस्त्याच्या दुतर्फा टॅक्सीची पार्किंग दिसते. कोणीही, कुठेही, कशीही गाडी उभी करतो. पोलिसांना चिरीमिरी दिली की तेही काही म्हणत नाहीत. त्यामुळे ना कायद्याची भीती, ना अधिकाऱ्यांची जरब, अशा स्थितीत यापेक्षा वेगळे काय घडेल. फेरीवाला धोरण मुंबईत आणले पाहिजे, याविषयी सगळे बोलतात. मात्र, त्यांच्या भागातील फेरीवाल्यांवर कारवाई होते तेव्हा व्होट बँक दिसते. आपल्या भागात फेरीवाल्यांना नाराज करायचे नाही. त्यांच्या कडून मिळणारी वरकमाई कोणालाही सोडायची नाही. मुंबईत लाखो फेरीवाले आहेत, त्यांच्याकडून दर महिन्याला गोळा होणारी रक्कम वर्षाकाठी काही हजार कोटींच्या घरात जाते. तीच अवस्था पार्किंगची आहे. महापालिकेने किती ठिकाणी अधिकृत पार्किंग केली आहे...? त्या ठिकाणचे दर काय आहेत? याविषयी कुठेही स्पष्ट फलक लावलेले मुंबईकरांना दिसत नाहीत. त्यामुळे कुठेही पार्किंग केली तरीही वाहतूक पोलिस फोटो काढून घेतात आणि ज्याची गाडी आहे त्याला ई-चलन पाठवतात किंवा बिनधास्तपणे पैसे तरी गोळा केले जातात.
फूटपाथ चालण्यासाठी असतात, हे महापालिका विसरून गेली आहे. वाहतूक पोलिसांनाही फूटपाथवर दुकान मांडून बसणाऱ्यांविषयी काहीही वाटत नाही. जागोजागी फूटपाथवर फेरीवाले आहेत. मध्यमवर्गीय माणूस नाईलाजाने फूटपाथ सोडून रस्त्यावर चालतो. तेथे रिक्षा, टू व्हीलर कुठेही, कशाही उभ्या असतात. त्यातून वाट काढत चालताना त्याच्या मागे-पुढे मृत्यू काळ बनून येतो, याची जाणीव त्यालाही नाही आणि नियंत्रण करणाऱ्या यंत्रणांनाही होत नाही.
पोलिसांना विचारले तर ते म्हणतात, आम्ही बदलीसाठी जे दिले ते कधी वसूल कराणार? असे उत्तर येते. महापालिकेने विकास आराखडा केला. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. जागोजागी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्याचे कसलेही नियोजन नाही. कुठूनही रस्ता बंद/चालू होतो. होणाऱ्या वाहतूक कोंडीची कोणालाही चिंता वाटत नाही. उपनगरातील ऑटोरिक्षा चालकांची दादागिरी हा स्वतंत्र विषय आहे. ठरावीक रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे बाकीचे बदनाम होतात.
मागे एक मोठे अनधिकृत होर्डिंग कोसळले. त्यात १७ जणांचे जीव गेले. ८० जखमी झाले. तेवढ्यापुरती चर्चा झाली. पुढे, बेकायदेशीर होर्डिंग्जच्या विरोधातली मोहीम थंडावली. रेल्वे प्रशासनाने त्यांच्या परिसरात लावल्या जाणाऱ्या अशा होर्डिंग्जबद्दलची भूमिका स्पष्ट केली नाही. पालिकेने त्या मोहिमेचा लॉजिकल एंड काय झाला, हे सांगितले नाही.
सोमवारी रात्री घडलेली घटना जर संध्याकाळी सहा ते आठ या वेळात घडली असती तर किती जणांचे जीव गेले असते, याची कल्पनाही करवत नाही. एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर बेस्टचे प्रमुख अनिल डिग्गीकर यांना सगळ्या माध्यमांना बोलावून नेमके काय घडले, हे सांगावे वाटले नाही. एक-दोन चॅनलला बाइट दिला म्हणजे आपले कर्तव्य संपले, असे त्यांना वाटले असावे. विविध माध्यमांचे पत्रकार त्यांना फोन करत होते. पण, फोन घेण्याचेही सौजन्य त्यांच्याकडे नव्हते. बेस्टच्या प्रमुखांची ही अनास्था असेल तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार?