What is the exact number of eleven? Student questions question | अकरावीच्या नेमक्या जागा किती? विद्यार्थ्यांपुढे प्रश्नचिन्ह
अकरावीच्या नेमक्या जागा किती? विद्यार्थ्यांपुढे प्रश्नचिन्ह

मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होऊन आत बायफोकल प्रवेशाची यादी जाहीर व्हायची वेळ आली, तरी अकरावीच्या एकूण जागा किती याची माहिती उपसंचालक विभागाकडून जाहीर करण्यात आली नाही. आरक्षित वर्गासाठी व खुल्या प्रवर्गासाठी नेमक्या किती जागा असतील, याचे गणित जुळविण्यात शिक्षण मंडळाला वेळ लागत असून, त्याचा परिणाम अकरावी प्रवेश प्रक्रियेवर होत आहे. एकूण जागांची माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू असून, ते आज पूर्ण होऊन जागा दुपारपर्यंत जाहीर होतील, अशी माहिती उपसंचालक कार्यालयातून देण्यात आली आहे.

कला, वाणिज्य, विज्ञान तसेच द्विलक्षीसाठी किती जागा आहेत, व्यवसायिकसाठी किती जागा आहेत. कोट्यातील जागांची संख्या किती, अशी सर्व माहिती समितीकडून प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याआधी जाहीर केली जाते, तसेच महाविद्यालयांची संख्या किती हेही सांगितले जाते. मात्र, आता बायफोकलची यादी जाहीर होण्याची वेळ आली, तरी अकरावीच्या जागांची आकडेवारी जाहीर केलेली नाही.

मराठा आरक्षण १६ टक्के, सवर्ण आरक्षण १० टक्के लागू झाल्याने आरक्षणाची टक्केवारी १०३ टक्क्यांवर पोहोचली. त्यामुळे शिक्षण विभागाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी इनहाउस कोट्यातील १० टक्के जागा कमी केल्या. मात्र, दहावीचा निकाल घसरल्याने शिक्षण विभागाने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांत प्रवेश मिळावा, यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील ९८ महाविद्यालयांंमध्ये ६६२२ जागा वाढविण्याचा निर्णय घेतला. तरीही आरक्षणाचा ताळमेळ न जुळल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना किती जागा उपलब्ध होतील, याची माहिती मिळालेली नाही. त्यामुळे महाविद्यालय निवडणे व पसंतीक्रम भरणे विद्यार्थ्यांसाठी अवघड झाले आहे.

बायफोकलची पहिली यादी आज
अकरावी प्रवेशातील बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमासाठी मुंबई विभागातून १४ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज, मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जाहीर करण्यात येईल. यंदा १४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी बायफोकलसाठी नोंदणी केली असून, मुंबई विभागातील २८ महाविद्यालयांत यंदा नव्याने बायफोकलची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनी २६ आणि २७ जूनपर्यंत महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घ्यायचे आहेत. यानंतर, दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू होईल व २८ जूनला दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल.


Web Title: What is the exact number of eleven? Student questions question
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.