राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 06:43 IST2025-07-06T06:42:54+5:302025-07-06T06:43:37+5:30
महाराष्ट्र पेटून उठतो, तेव्हा काय घडते हे राज्यकर्त्यांना समजले असेल

राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
मुंबई: उद्धव आणि मी तब्बल २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. जे बाळासाहेबांना जमले नाही, अनेकांना जमले नाही आम्हाला एकत्र आणायला, ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखविले, अशी बोचरी टिप्पणी करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाची एकजूट तुटु देऊ नका. कोणतीही तडजोड न करता बाळासाहेबांचे स्वप्न साकार करूया, असे भावनिक आवाहन विजय मेळाव्यात केले. राज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सन्माननीय उद्धव ठाकरे.. अशी केली, तेव्हाच दोधांमधील दुरावा मिटल्याचे दिसून आले.
खरे तर आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस सर्व बाजूंनी कसा एकवटतो, हे चित्र त्यांना दिसले असते. पण, फक्त मोर्चाच्या घोषणेनेच यांनी (सरकारने) माघार घेतली, असे राज यांनी म्हणताच शिट्टचा व टाळ्यांनी सभागृह दणाणून गेले. राज म्हणाले की, राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय सरकारने कोणासाठी आमी सत्ता आहे, बहुमत आहे, आम्ही निर्णय लादणार अरी तुम्हाला वाटत असेल तर तुमची सत्ता विधानभवनात. आमच्याकडे सत्ता रस्त्यावरची आहे.
ठाकरे बंधूच्या मुलांनी कॉन्व्हेन्ट शिक्षण घेतल्याच्या भाजपच्या टीकेचा राज यांनी समाचार घेतला, परदेशात शिक्षण येणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या मुलांची यादी आपल्याकडे आहे. माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे इंग्रजी शाळेत शिकले, त्यांच्या मराठी निष्ठेवर शंका घेणार का? लालकृष्ण अडवाणी मिशनरी शाळेत शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न घेणार का? असे म्हणत त्यांनी इंग्रजी माध्यमांत शिक्षण घेतलेल्या दक्षिणेतील नेत्यांची यादी वाचून दाखवली. कोर्टात सगळ्या गोष्टी इंग्रजीत होतात. केंद्राच्या शिक्षण धोरणात, इतर राज्यातही हिंदी नाही. महाराष्ट्रात त्यांनी प्रयोग करून पाहिला मुंबई स्वतंत्र करता येते का, हे त्यांनी चाचपडून पाहिले, त्यांना मजाक वाटला का, असा सवाल करत महाराष्ट्र पेटून उठतो, तेव्हा काय घडते हे राज्यकत्यांना समजले असेल, त्याशिवाय का माघार घेतली? असा चिमटा राज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना काढला.
भाषणापेक्षा एकत्र दिसणे महत्त्वाचे; दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार : उद्धव
मुंबई: दोघांमध्ये असलेला अंतरपाट दूर होऊन आता एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी, या शब्दांत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजय मेळाव्यात राज ठाकरेंना भविष्यातील एकीसाठीही टाळी दिली, तेव्हा सभागृहात हजारो कार्यकत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.
राज यांचा सन्माननीय असा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी भाषेचा विषय हा तरवरचा विषय नाही आमच्या भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे. दोघांना भांडवले जात होते. आम्ही एकत्र येणार समजल्यावर काहीजणांनी यांचा 'म' महापालिकेसाठी आहे, अशी टीका केली. हा 'म' फक्त महापालिकेचा नाही, तर महाराष्ट्राचाही आहे. सत्ता येते-जाते, पण आपल्यामध्ये एकजुटीची ताकद हवी. आम्ही महाराष्ट्रसुद्धा काबीज करू महाराष्ट्रात मराठीच राहणार, हिंदीची सक्ती केल्यास अशी शक्ती दाखवू की, पुन्हा डोके वर काढता येणार नाही.
अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला, असा टोलाही त्यांनी लगावला. आता अक्षता टाकण्याची काही अपेक्षा नाही, असे सांगत त्यांनी शिंदे गटावरही टीका केली. अनेक युवा, महाराज बसले हे आज असतील, कोणी लिंबूला टाचण्या टोचत असतील. कुणी अंगारे धुपारे करत असतील, कुणी रेडे कापत असतील, अशी खिल्ली उडवत आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे वारसदार म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत, असेही ते म्हणाले
मधल्या काळात आम्ही दोघांनी नतद्रष्टांचा अनुभव घेतला. वापरायचे व फेकून द्यायचे. आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. भाजप ही अफवांची फैक्टरी आहे. भाजपच्या सात पिल्या उतरल्या तरी हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या 'जय गुजरात घोषणेचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले की, तो जय गुजरात बोलला. किती लाचारी करायची? त्या पुष्पा चित्रपटातील नायक दाढीवर हात फिरवून झुकेगा नहीं साला म्हणतो, तसे हे 'उठेगा नहीं साला च्या भूमिकेत आहेत.