शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता? मुनगंटीवारांनी दिले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 09:31 IST2025-03-13T09:30:49+5:302025-03-13T09:31:11+5:30

शक्तिपीठ करा, पण... पहिले पाणंद रस्ते करा

What are you afraid of to provide loan waiver to farmers Sudhir Mungantiwar gave challenge | शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता? मुनगंटीवारांनी दिले आव्हान

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता? मुनगंटीवारांनी दिले आव्हान

मुंबई : अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना भाजप आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच आव्हान देत बुधवारी विधानसभेत एकप्रकारे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली.

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता, डेअरिंग करा, असे आव्हान देताना मुनगंटीवार यांनी ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. कर्जमुक्तीची रक्कम २० हजार कोटी रुपये आहे. आपण कर्मचाऱ्यांच्या वेतनावर २०२३-२४ मध्ये १ लाख ४२ हजार ७१८ कोटी रुपये खर्च केला. २०२४-२५ मध्ये त्यात १६,३१६ कोटी रुपयांची वाढ झाली. निवृत्तिवेतनासाठी आपण १३ हजार ५६५ कोटी रुपये देतो. म्हणजे एका वर्षात आपण शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन आणि निवृत्तिवेतनात २९ हजार ८८१ कोटींची वाढ देतो. एकीकडे आपण ही वाढ देतो, तर दुसरीकडे तिजोरीत पैसे नाहीत म्हणून आपण कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका योग्य नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

मुनगंटीवार म्हणाले...

सरकार शक्तिपीठ महामार्गाचे जोरदार समर्थन करत आहे. शक्तिपीठ करा, त्यासाठी ८६ हजार ३०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. पण पहिल्यांदा  पाणंद रस्त्यांना पैसे द्या.

संजय गांधी निराधार योजना ऑनलाइन करण्याचे कुणाच्या सुपीक डोक्यात आले. चंद्रपूरधील या योजनेचे नोव्हेंबरनंतरचे पैसे आलेले नाहीत. 

आपण दावोसवरून १५ लाख ७२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणली, त्यातून १६ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. पण कोणत्या सेक्टरमध्ये हा रोजगार उपलब्ध होणार, याची माहितीच अधिकाऱ्यांकडे नाही, असेही ते म्हणाले.
 

Web Title: What are you afraid of to provide loan waiver to farmers Sudhir Mungantiwar gave challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.