मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे फलित काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 09:52 IST2025-01-13T09:51:38+5:302025-01-13T09:52:05+5:30
मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील चारोटी (सूर्या नदी पुलावर) येथे ४ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या अपघातात उद्योगपती सायरस मिस्त्री आणि जहांगीर या दोघांचा मृत्यू झाला होता.

मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे फलित काय?
- हितेन नाईक
पालघर समन्वयक
मुंबई- अहमदाबाद महामार्गावर प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षित प्रवासाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर ५५३ कोटी रुपयांच्या खर्चातून नव्याने व्हाइट टॅपिंगच्या माध्यमातून १२१ किलोमीटरचे काम सुरू झाले. या कामामुळे लोकांना सुविधा निर्माण होणे अपेक्षित होते; पण निकृष्ट काम आणि अनियोजित रस्ता बांधकामामुळे आतापर्यंत मनोर ते चारोटीदरम्यान ७० प्रवाशांचा बळी गेला आहे. त्यामुळे हा महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे.
मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील चारोटी (सूर्या नदी पुलावर) येथे ४ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या अपघातात उद्योगपती सायरस मिस्त्री आणि जहांगीर या दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत्यूचा सापळा बनत चाललेल्या या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्र कमी करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना आखण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यानुसार महामार्गाच्या १२१ किलोमीटर पट्ट्याचे काम हाती घेण्यात आले असून ५५३ कोटी रुपयांचा खर्च या रस्ते उभारणीवर होत आहे.
महामार्गावर अनेक भागांत पडलेले खड्डे, साचणारे पाणी आदी समस्यांचा निपटारा करण्यासाठी महामार्गावर व्हाइट टॅपिंग रस्ता बनवण्याचे काम डिसेंबर २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे काम करताना नियोजनाचा अभाव असल्याची बाब अनेक वेळा समोर आली आहे. या दोन वर्षांत दहिसर ते अच्छाड या १२१ किलोमीटरच्या रस्त्यावर आतापर्यंत १५९ अपघातामध्ये १२० मृत्यू, तर १५८ जखमी झाले आहेत. यामुळे महामार्गावरील मृत्यूचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढल्याचेच दिसून येत आहे.
दुसरीकडे याच मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे तारापूर, पालघर, वसई येथील औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांना कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. मुंबई, ठाणे या महानगरासह गुजरात राज्यांतून जिल्ह्यातील केळवे, बोर्डी, वसई येथील पर्यटन स्थळांवर येणाऱ्या पर्यटकांची संख्याही रोडावल्याचा मोठा फटका पर्यटक व्यावसायिकांना बसला आहे. त्यामुळे या महामार्गामुळे लोकांचे जीवन सुखकर होण्यापेक्षा वेदनामय झाले आहे. महामार्गावर असुविधेचा फटका बसल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत संबंधित मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासोबत मागील दोन वर्षांत डझनभर बैठका झाल्या असल्या तरी या महामार्गावरील अपघातांचे सत्र कमी होण्याऐवजी वाढले. सद्य:स्थितीत हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, इतक्या लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या ठेकेदाराला हात लावण्याची हिंमत ना सरकारने दाखवली, ना प्रशासनाने.
महामार्गावर काम करताना ठेकेदाराने दररोज ३०० ते ४०० मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची क्षमता असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात ठेकेदाराने नियोजनबद्ध काम न केल्याने या रस्त्याला विविध समस्यांनी वेढले आहे. वाहतूक कोंडीमुळे एक तासाच्या प्रवासासाठी ४-५ तास लागत असल्याने कंटाळून उद्योगपती, व्यावसायिकांनी रेल्वे प्रवासाकडे आपला मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे. वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेतून मुंबई, ठाणे येथे उपचारासाठी जाणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांना बसत आहे. आज दोन वर्षांनंतरही या महामार्गावरील समस्या ‘जैसे थे’ असून, या महामार्गावर अनेक ठिकाणी अर्धवट कामे करून सोडून देण्यात आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.