भीती कशाची वाटतेय मर्दा? पुरुष नसबंदीला अल्प प्रतिसाद; १५ दिवसांत केवळ २४ शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:01 IST2025-12-18T12:00:43+5:302025-12-18T12:01:54+5:30
आरोग्य विभागामार्फत समुपदेशन, जागृती कार्यक्रम आणि आर्थिक प्रोत्साहन दिले असतानाही पुरुषांचा सहभाग अत्यल्प राहिला.

भीती कशाची वाटतेय मर्दा? पुरुष नसबंदीला अल्प प्रतिसाद; १५ दिवसांत केवळ २४ शस्त्रक्रिया
मुंबई : राज्यात २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत पुरुष नसबंदी पंधरवडा पार पडला. कुटुंब नियोजनामध्ये पुरुषांचा सहभाग वाढवणे, महिलांवरील शस्त्रक्रियेचा ताण कमी करणे आणि पुरुष नसबंदीबाबत असलेले गैरसमज दूर करणे, हा या पंधरवड्याचा मुख्य उद्देश होता. मात्र, प्रत्यक्षात मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मुंबईत केवळ २४ पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली.
आरोग्य विभागामार्फत समुपदेशन, जागृती कार्यक्रम आणि आर्थिक प्रोत्साहन दिले असतानाही पुरुषांचा सहभाग अत्यल्प राहिला. परिणामी, कुटुंब नियोजनाची जबाबदारी आजही महिलांवरच ढकलली जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पुरुष नसबंदीबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. नसबंदीमुळे शारीरिक ताकद कमी होते, काम करण्याची क्षमता घटते किंवा पुरुषत्वावर परिणाम होतो, अशा चुकीच्या समजुतींमुळे अनेक पुरुष पुढाकार घेत नाहीत. प्रत्यक्षात पुरुष नसबंदी ही सोपी, सुरक्षित आणि कमी वेळेत होणारी शस्त्रक्रिया असून त्याचे दुष्परिणाम नगण्य आहेत.
शस्त्रक्रियेनंतर आर्थिक मदत, विविध सुविधा
नसबंदी केल्यानंतर पुरुषांना आर्थिक मदत दिली जाते, तसेच विश्रांतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तरीही जनजागृतीचा अभाव आणि सामाजिक मानसिकता बदलत नसल्याने अपेक्षित परिणाम साधता आलेले नाहीत.
पुरुष नसबंदी ही सुरक्षित व प्रभावी कुटुंब नियोजन पद्धत आहे. महिलांप्रमाणेच पुरुषांनीही जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. यासाठी आगामी काळात जनजागृती मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार आहेत.
कुटुंब नियोजनात समतोल साधण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे, हीच आजची खरी गरज असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.